चंडीगड महानगरपालिकेवर फुलले कमळ

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

चंडीगड : भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दलाच्या युतीला चंदीगड महानगरपालिका निवडणूकीत 26 पैकी 21 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

चंडीगड : भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दलाच्या युतीला चंदीगड महानगरपालिका निवडणूकीत 26 पैकी 21 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

निवडणूक विभागाच्या प्रवक्‍त्याने याबाबत माहिती दिली. भाजप-अकाली युतीला मिळालेल्या 21 जागांपैकी तब्बल 20 जागा भाजपला मिळाल्या आहेत. तर एका जागेवर अकाली दलाचा उमेदवार विजेता ठरला आहे. उर्वरित पाच पैकी चार जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले असून एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी ठरला आहे. चंडीगड महानगरपालिकेसाठी 59.54 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी 122 उमेदवार उभे होते. त्यापैकी 67 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवित होते. चंडीगडमध्ये एकूण 5 लाख 7 हजार 627 मतदार आहेत. त्यापैकी 2 लाख 37 हजार 374 महिला मतदार आहेत. या निवडणूका म्हणजे नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाची चाचणी असल्याची चर्चा करण्यात येत होते. मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 15 तर काँग्रेसला नऊ आणि बहुजन समाज पक्षाला एक जागा मिळाली होती. मात्र, यंदा भाजपने मोठी भरारी घेतली असून काँग्रेसला मोठे नुकसान झाले अहे. काँग्रेस आणि भाजपने संपूर्ण 26 जागांवर निवडणूक लढविली होती. तर बहुजन समाज पक्षाने एकूण 17 जागांवर निवडणूक लढविली होती.

भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी चंडीगडमधील मतदारांचे आभार मानले आहेत. 'नोटाबंदीनंतर आलेल्या निवडणुकीत मतदारांनी नोटाबंदीचा निर्णय स्वीकारल्याचे दिसून येत आहे', अशा प्रतिक्रिया शाह यांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

Web Title: BJP-SAD alliance sweeps Chandigarh MC poll