हिरे व्यापारी नीरव मोदीला वाचविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील; भाजपचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 14 May 2020

पाच वर्षांपूर्वी काँग्रेसवासी झालेल्या एका निवृत्तन्यायाधीशांनी ब्रिटनमधील सुनावणीदरम्यान नीरव मोदीच्या बाजूने साक्ष दिलीअसा आरोप केंद्रीयकायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणातील फरार हिरे व्यापारी नीरव मोदी भारतात परत येऊ नये किंवा त्याला आणले जाऊ नये यासाठी, एवढेच नव्हे तर त्याला वाचविण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाच्या सर्वोच्च पातळीवरून अतिशय संशयास्पद हालचाली सुरू आहेत, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने आज केला. 

.ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पाच वर्षांपूर्वी काँग्रेसवासी झालेल्या एका निवृत्त न्यायाधीशांनी ब्रिटनमधील सुनावणीदरम्यान नीरव मोदीच्या बाजूने साक्ष दिली, असा आरोप केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला. प्रसाद यांनी नाव घेतले नसले तरी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी अलाहाबाद न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अभय ठिपसे यांचे थेट नाव घेतले आहे. नीरव याने बॅंकांना गंडा घालून केलेले सारे गैरव्यवहार काँग्रेसच्याच शासनकाळातले आहेत, असे भाजपने सुरुवातीपासून स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘त्या’ दिवशी रात्रीच्या पार्टीत राहुल आणि नीरव यांच्यात काय देवघेव झाली? असा सवालही पात्रा यांनी आज विचारला. 

ठिपसे यांनी २०१५ मध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, ते छायाचित्र दाखवून प्रसाद म्हणाले की, ही सुनावणी सुरू असताना एका आरोपीच्या बाजूने साक्ष देण्याचे या निवृत्त न्यायाधीश महोदयांना कारणच काय? ब्रिटनमधील सुनावणी प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न हे महाशय का करत होते? नीरवच्या विरोधातील आरोप भारतीय कायद्याच्या कसोटीवर टिकणारे नाहीत, हे तर्कट त्यांना कोणी सांगितले? मात्र काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी भारतीय तपास संस्था ब्रिटनमधील न्यायसंस्थेतील लढाई जिंकतील, असाही विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला. 

भाजपने दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची सुनावणी लंडनमधील ज्या न्यायालयात सुरू होती, त्या सुनावणीदरम्यान ठिपसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष दिली. त्यात त्यांनी असे म्हटले की नीरव विरुद्ध केंद्रीय तपास संस्थांनी केलेले आरोप भारताच्या कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाहीत. भारतात नीरवविरुद्धचे प्रकरण आर्थिक धोकेबाजी या स्वरूपात मोडणारच नाही, असेही त्यांनी आपल्या साक्षीत सांगितले. 

इथे भारतामध्ये राहुल गांधी नीरव मोदीवरून सरकारला प्रश्न विचारतात. पण राहुल यांचे खास आणि काँग्रेसचे अभय ठिपसे (निवृत्त न्यायाधीश) नीरव मोदीचे साक्षीदार बनतात. नीरव भारतात येऊच नये असे राहुल गांधींना वाटते, यामागचे कारण काय? 
- संबित पात्रा, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP says Congress trying its best to save businessman Nirav Modi