बलात्कारातील आरोपी आमदाराची भाजपकडून पाठराखण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

- विरोधी पक्षांचा आरोप
- अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक

लखनौ ः उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेला भाजपचा आमदार कुलदीपसिंह सेंगर याची भाजपकडून पाठराखण केली जात असल्याचा आरोप आज कॉंग्रेस, समाजवाही पक्ष (सप) आणि बहुजन समाज पक्षाकडून (बसप) करण्यात आला.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील 19 वर्षीय पीडित तरुणीच्या गाडीला रायबरेलीजवळ झालेल्या अपघातप्रकरणी आमदार सेंगर आणि इतर नऊ जणांच्या विरोधात सोमवारी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या अपघातामध्ये पीडित तरुणीची आत्या आणि मावशीचा मृत्यू झाला होता. तर पीडित तरुणी आणि तिचा वकील गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छ्वास यंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. हा अपघात नसून, घातपाताचा प्रकार आहे, असा आरोप करत पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी सेंगर हा त्यासाठी जबाबादार असल्याचा दावा केला आहे. अपघाताचा मुद्दा संसदेत उपस्थित झाल्यानंतर आणि चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर सेंगरसह दहा जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रविवारी झालेल्या अपघातप्रकरणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून, या अपघातामागे नियोजित कट होता, असा आरोप केला आहे. 

दरम्यान, या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी उत्तर प्रदेशातील सरकारसह भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. बसपच्या मायावतींनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे, की लोकसभा निवडणुकीत उन्नावमधून विजयी झालेले भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी तुरुंगात जाऊन सेंगर याची भेट घेत त्याचे आभार मानले होते. या वरून हे स्पष्ट होते, की सत्ताधारी भाजपकडून आरोपी आमदार सेंगर याची पाठराखण केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतःहून दखल घ्यायला हवी.

आमदार सेंगर याचे भाजपमधून निलंबन मागणी करत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी रुग्णालयात जाऊन पीडित तरुणीची भेट घेतली. रविवारी झालेल्या अपघातासाठी राज्य सरकार जबाबदार आहे, असा आरोप यादव यांनी केली. अपघातात जखमी झालेली तरुणी आणि तिच्या वकिलाला काही झाले तर त्यास जबाबदार कोण असेल, अशी विचारणा यादव यांनी केली. 

पीडितेच्या कुटुंबीयाचे धरणे आंदोलन 
रुग्णालयाच्या बाहेर पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी आज आंदोलन केले. रायबरेलीतील तुरुंगात असलेले पीडित तरुणीचे काका महेशसिंह यांची मुक्तता करण्याची मागणी या वेळी करण्यात आले. महेशसिंह यांच्या पत्नीचा अपघातात मृत्यू झाला आहे. पत्नीवर अंतिम संस्कार करण्यासाठी महेशसिंह यांना पॅरोल मंजूर करावा, अशी मागणीही करण्यात आली. अखिलेश यादव यांनी मध्यस्थी केल्यानंतर कुटुंबीयांनी धरणे आंदोलन मागे घेतले. दरम्यान, पत्नीच्या अंतिम संस्कारांसाठी महेशसिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

सेंगरचे निलंबन केल्याचा दावा 
- रविवारी झालेल्या अपघातापूर्वीच पीडित तरुणीने सरन्यायाधीशांना लिहिले होते पत्र 
- आरोपी सेंगरकडून आपल्याला आणि कुटुंबीयांना धोका असल्याचा पत्रात उल्लेख 
- दिल्लीतील उत्तर प्रदेश भवनासमोर आज महिला संघटनांची निदर्शने 
- राज्य सरकारकडून हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप 
- पंतप्रधान मोदींनी आरोपी सेंगर याची पक्षातून हाकालपट्टी करावी ः प्रियांका गांधी 
- एका घटनेवरून राज्य सरकारवर आरोप करणे चुकीचे ः राम नाईक 
- सेंगरचे पूर्वीच भाजपमधून निलंबन ः उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP supports accused mla in rape