भाजप-पीडीपीचा काडीमोड; मेहबूबांचाही राजीनामा 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

काडीमोडीची भाजपची कारणे 
- काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद, कट्टरवाद व हिंसाचार वाढला 
- जम्मूला सापत्नभावाची वागणूक 
- केंद्राच्या विकास योजनांत मेहबूबा यांचे अडथळे 
- दहशतवाद्यांनी नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारास नख लावले. 
- पत्रकार बुखारी यांच्या हत्येने हिंसाचाराचा कळस गाठला 
-शस्त्रसंधी वाढवण्यावरून मतभेद 

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने जम्मू-कश्‍मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीबरोबरची (पीडीपी) तीन वर्षांची युती दहशतवादाच्या मुद्यावर अखेर संपुष्टात आणली. राज्याच्या मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा भाजपचे जम्मू-काश्‍मीर प्रभारी राम माधव यांनी आज दुपारी केली. भाजपच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे राज्यपाल एन. एन. व्होरा यांचेकडे दिल्याचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी सांगितले. यापाठोपाठ मेहबूबा यांनीही आपला राजीनामा दिला. कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सनेही कोणाशीही युती न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या अशांत राज्याची सूत्रे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या हाती संपूर्णपणे आली आहेत. 

श्रीनगरमधील ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या नुकत्याच झालेल्या हत्येचा ठळक उल्लेख करून माधव म्हणाले, ""दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येबद्दल राज्याचे नेतृत्व गप्प बसले. काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद, कट्टरवाद व हिंसाचार वाढला आहे. अशा स्थितीत सरकारमध्ये राहणे अशक्‍य झाले आहे.'' भाजपने आता राज्यात राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. 

"रमजानच्या महिन्यात केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबविली. यावरून दोन्ही पक्षांत मतभेद होते. मतभेदांमुळे भाजप यापुढे सत्तेत राहू शकत नाही. हुर्रियतसह साऱ्या फुटीरतावाद्यांशी सरसकट चर्चा करण्याची मेहबूबा यांची मागणी भाजपला मंजूर नव्हती,'' असे असेही राम माधव यांनी स्पष्ट केले. 

जम्मू-काश्‍मीरमधील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी काश्‍मिरातील परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर माधव, निर्मल सिंह, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आदींनी पत्रकार परिषद घेऊन मेहबूबा सरकारच्या पायाखालील सतरंजी ओढून घेतल्याची घोषणा केली. 

माधव म्हणाले, ""गृह मंत्रालय व केंद्रीय संस्थांकडून (वाढत्या दहशतवादाबद्दल) वारंवार सूचना येऊ लागल्यावर आम्ही पंतप्रधान मोदी व शहा यांचा सल्ला घेतला. त्यानंतर भाजप या निष्कर्षावर पोचला की राज्यात युतीच्या मार्गावरून चालणे भाजपला अशक्‍य आहे. काश्‍मीर खोऱ्यात वाढत्या दहशतवादाला व कट्टरपंथाला आळा घालण्यात युतीचे नेतृत्व (मेहबूबा) अपयशी ठरले आहे.'' ते म्हणाले, ""काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी लोकांच्या बोलण्याच्याच नव्हे, तर जगण्याच्या अधिकारास नख लावले आहे. पत्रकार बुखारी यांची हत्या खोऱ्यातील परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करणारी आहे. रमजानच्या महिन्यात आम्ही लष्करी कारवाई थांबविली. आम्हाला दहशतवादी शक्ती व हुर्रियतसारख्या फुटीरतावादी संघटना चांगला प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने तसे घडले नाही. केंद्रातील भाजप सरकारकडून जम्मू-काश्‍मीर-लडाख या तिन्ही विभागांच्या समान विकासासाठी सर्वतोपरी मदत देण्यात आली; पण राज्य सरकारकडून जम्मूला सापत्नभावाची वागणूक मिळाली. राज्य सरकारने विकास योजनांत कायम अडथळेच आणण्याची भूमिका ठेवली. अशा स्थितीत या सरकारमध्ये राहणे भाजपला यापुढे शक्‍य नाही. राज्यात राज्यपाल राजवट लागू केल्यास परिस्थिती सुधारू शकते, असे भाजपला 

काडीमोडीची भाजपची कारणे 
- काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद, कट्टरवाद व हिंसाचार वाढला 
- जम्मूला सापत्नभावाची वागणूक 
- केंद्राच्या विकास योजनांत मेहबूबा यांचे अडथळे 
- दहशतवाद्यांनी नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारास नख लावले. 
- पत्रकार बुखारी यांच्या हत्येने हिंसाचाराचा कळस गाठला 
-शस्त्रसंधी वाढवण्यावरून मतभेद 

जम्मू-काश्‍मीर विधानसभा बलाबल 
एकूण जागा ः 87 
पीडीपी ः 28 
भाजप ः 25 
नॅशनल कॉन्फरस ः 15 
कॉंग्रेस ः 12 
अन्य ः 7 

Web Title: Bjp Takes Back Support From Pdp