उपराष्ट्रपतीपद निवडणुकीत भाजपचा निर्भेळ विजय निश्चित

भाजपकडे आवश्यकतेपेक्षा किमान ७ मते जास्त
BJPs victory in Vice Presidential election is fix
BJPs victory in Vice Presidential election is fixsakal

नवी दिल्ली - राष्ट्पतीपदा पाठोपाठ उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत फक्त संसद सदस्यांना मतदानाचा अधिकार असल्याने दोन्ही सभागृहांतील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्या सत्तारूढ भाजपचा निर्भेळ विजय स्पष्ट आहे. आताच फक्त भाजपकडे आवश्यकतेपेक्षा किमान ७ मते जास्त आहेत. सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) व भाजपला वरिष्ठ सभागृहात वेळोवेळी मदतीचा हात देणारे बीजू जनता दल, वायएसआर कॉंग्रेस, अण्णाद्रमुक, रिपबल्किन पक्ष (आठवले) आदींच्या खासदारांची भाजप उमेदवाराला मिळणारी मते वेगळी असतील.

दरम्यान भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने या पदासाठीच्या उमेदवाराचे ‘ आपल्या मनातील' नाव अद्याप सार्वजनिकरीत्या जाहीर केलेले नाही. भाजपच्या गोटातून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केरळचे राज्यपाल आरीफ महंमद खान आदींची नावे यापूर्वीच ‘पेरण्यात' अली आहेत. राज्यसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीध्येही भाजपची उमेदवारी न मिळालेल्या नक्वींचे पारडे सध्या तरी जड असल्याचे सांगितले जाते.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यांना पुन्हा संधी मिळण्याची अजिबात शक्यता नाही, हा ‘सांगावा‘ देण्यासाठी पक्षनेतृत्वाने भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना नुकतेच नायडूंकडे पाठविले होते अशी चर्चा आहे. या पदासाठी ६ आॅगस्ट रोजी राज्यसभेच्या जवळील क्र. ६३ या दालनात मतदान होईल व शक्यतो त्याच दिवशी निकालही जाहीर होईल. येत्या १८ जुलैला सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशनही या काळात अखेरच्या टप्प्यात आलेले असेल. पावसाळी अधिवेशनात चालू असतानाच राज्यसभेचे नवे सभापतीही वरिष्ठ सभागृहाचा पदभार स्वीकारतील.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत लोकसभेत ५४३ आणि राज्यसभेत २३२ खासदार मतदान करतात. वर्तमान लोकसभेत ३०३ तर राज्यसभेत ९२ खासदारांचे बळ भाजपकडे आहे. एनडीए गृहीत धरल्यास लोकसभेतील भाजपचे बळ प्रचंड म्हणावे इतके आहे. फक्त भाजपकडे सध्या ३९५ खासदार आहेत. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ३८८ मते आवश्यक असतात.

दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सुरवातीला भाजपकडे बहुमताच्या १ टक्के कमी मते होती. यासाठीच्या इलेक्ट्रोरल कॉनेजमध्ये फक्त भाजपकडे ४२ टक्के पेक्षा जास्त मते होती. मात्र महाराष्ट्रातील सत्तांतर व भाजपने द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने आदिवासी व महिला उमेदवाराचे नाव पुढे केले आणि सारे चित्रच बदलले.

मुर्मू यांना बिजू जनता दल (सुमारे ३ टक्के मते), वायएसआर काँग्रेस (४ टक्के मते) आणि अकाली दल (०.१६ टक्के मते) यांनी पहिल्याच फटक्यात पाठिंबा जाहीर केला. दिल्लीतील सत्तारूढ आपने पत्ते उघडलेले नसले तरी अगदी अखेरच्या क्षणी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल मुर्मू यांनाच पाठिंबा देतील असे मानले जात आहे. साहजिकच मुर्मू या येत्या २१ जुलै रोजी भारताच्या नवीन राष्ट्रपती म्हणून निवडून येण्याचा मुर्मू यांचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com