
आयुर्वेदीक डॉक्टरने एका महिलेवर केलेल्या ऑपरेशननंतर तिचा मृत्यू झाला होता.
मुंबई : आयुर्वेदीक डॉक्टरने एका महिलेवर केलेल्या ऑपरेशननंतर तिचा मृत्यू झाला होता. आयुर्वेदिक डॉक्टरला याप्रकारचे ऑपरेशन करण्याची परवानगी नसताना या मृत्यूबाबत हलगर्जीपणाचा आरोप ठेवत सत्र न्यायालयाने आरोपी डॉक्टरला 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. मुंबई हायकोर्टाने ही शिक्षा रद्द केली आहे. याबाबतचा निर्णय जस्टीस एस.के. शिंदे यांच्या न्यायपीठाने दिला. डॉ. सचिन देशपांडे यांनी दाखल केलेल्या अपीलमधील अंतरिम अर्जावर सुनावणी करताना हा निर्णय दिला गेला. आरोपीचे वकील अनिकेत निकम यांनी म्हंटले की, हे ऑपरेशन चांगल्या आणि योग्य पद्धतीने झाल्याची साक्ष सत्र न्यायालयाने ध्यानात घेतली नव्हती. त्यामुळे हायकोर्टाने हा दोष मागे घेतला पाहिजे.
हेही वाचा - वाशिम आणि विदर्भ गुलाम नबी आझादांचं योगदान विसरणार नाही - शरद पवार
वकील निकम यांनी पुढे सांगितलं की, या प्रकरणातील पहिल्या आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. समानतेच्या न्यायाने डॉ. देशपांडे यांना देखील जामीन मिळायला हवा.
या घटनेतील मृत महिला दुसऱ्यांदा गर्भवती होती. ती या खटल्यातील पहिल्या आरोपीच्या नर्सिंग होममध्ये गेली होती. सिझेरियनद्वारे बाळंतपण करण्यास ती राजी झाली होती. 1 मे 2012 रोजी डॉ. देशपांडे यांच्याकडून ऑपरेशन आणि ट्यूबक्टोमी करण्यात आली. शुद्धीत आल्यानंतर त्या महिलाल रक्तस्त्राव व्हायला लागला. त्यानंतर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिथे तिचा मृत्यू झाला. याबद्दल डॉ. देशपांडे यांच्यावर IPC च्या कलम 304 नुसार खटला दाखल करण्यात आला. गेल्या वर्षी 29 सप्टेंबर रोजी सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आणि महिलेच्या पतीला 2.5 लाखांची भरपाई द्यायला लावली.