वाशिम आणि विदर्भ गुलाम नबी आझादांचं योगदान विसरणार नाही - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 February 2021

राज्यसभेतील 4 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेतील 4 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये संसदेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुलाम नबी आझाद यांच्या एकूण कारकिर्दीचा गौरव केला. त्यांच्या एकूण कारकिर्दीबाबत सविस्तरपणे बोलत त्यांचं योगदान हा देश कधीही विसरणार नसल्याचं  त्यांनी म्हटलं. 

राज्यसभेत शरद पवार म्हणाले की, गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरमधून येतात. ज्या भागाविषयी आपण सध्या चिंतित आहोत, त्याच भागातले ते आहेत. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी अनेक वर्षापासून मिळाली आहे. राजकारणामध्ये त्यांनी सुरवातच काँग्रेसच्या विचारधारेने केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये युवकांचे संघटन करत त्यांनी कामास सुरवात केली. त्यांचं ते काम पाहून तत्कालीन नेतृत्वाने त्यांच्या कौशल्यास ओळखून त्यांच्यावर इंडियन युथ काँग्रेसची जबाबदारी सोपवली. त्या जबाबदारीनुसार त्यांनी संपूर्ण देशातील आणि राज्यातील नव्या पीढीला संघटीत करण्याचं काम त्यांनी उत्तमरितीने पार पाडलं.

हेही वाचा - राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक, काँग्रेसच्या नेत्याविषयी बोलताना अश्रू अनावर
पुढे त्यांनी एक जुनी आठवण सांगितली. शरद पवार म्हणाले की,  गुलाम नबी आझाद यांच्यासाठी 1982 हे वर्ष अविस्मरणीय असेल, यात शंका नाही. कारण एकतर या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि दुसरं म्हणजे याच वर्षी ते महाराष्ट्रातील सर्वांत मागास जिल्हा वाशिममधून उभे राहिले. त्यावेळी मी विरोधकांमध्ये होतो. तेंव्हा आम्ही वाशिममध्ये प्रचार केला की काश्मीरमधून आलेले इथं निवडणूक लढवताहेत. त्यांना आम्ही ही संधी देणार नाही. मात्र, तिथून ते मोठ्या मतांनी निवडून आले. ते सातत्याने त्यानंतर तिथून जिंकत राहिले. त्यांनी त्यावेळी अनेक क्षेत्रातील समस्या सोडवत निव्वळ जिल्ह्याचाच नव्हे तर विदर्भाच्या प्रगतीसाठी अभूतपूर्व असं कार्य केलं. त्यांचं काम हा देश कधीही विसरणार नाही.

यात पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदीदेखील बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याविषयी बोलताना ते भावूक झाले. गुलाम नबी आझाद यांची नम्रता, देशाच्या उन्नतीच्या कामना त्यांना शांत बसू देणार नाही. देशाच्या विकासासाठी ते काम करत राहतील, असं म्हणत त्यांनी आझाद यांमा सल्यूट केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad Pawar on gulam nabi azad during farewell to retiring members in Rajya Sabha