गुजरातमध्ये ब्राह्मणांची आरक्षणाची मागणी

पीटीआय
शनिवार, 1 डिसेंबर 2018

गुजरातमध्ये 60 लाख ब्राह्मण आहेत. हा आकडा एकूण लोकसंख्येपैकी 9.5 टक्के आहे. त्यातील 42 लाख ब्राह्मण हे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यानुसार, गुजरात सरकारने सर्वेक्षण करून ब्राह्मणांना आरक्षण द्यावे, अशी मागणी संघटनेचे प्रमुख यज्ञेश दवे यांनी केली आहे. 

अहमदाबाद : महाराष्ट्र सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे पडसाद इतर राज्यांतही उमटू लागले आहेत. गुजरातमधील ब्राह्मण आणि राजपूत समाजांनी आरक्षणाची मागणी केली आहे. येथील पाटीदार समाजाने अगोदरच आरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळले जाण्याची शक्‍यता आहे. 

समस्त गुजरात ब्राह्मण समाजाने राज्य ओबीसी आयोगाला आरक्षणाची मागणी करणारे पत्र पाठविले आहे. ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण देण्यात यावे, त्यासाठी सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गुजरातमध्ये 60 लाख ब्राह्मण आहेत. हा आकडा एकूण लोकसंख्येपैकी 9.5 टक्के आहे. त्यातील 42 लाख ब्राह्मण हे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यानुसार, गुजरात सरकारने सर्वेक्षण करून ब्राह्मणांना आरक्षण द्यावे, अशी मागणी संघटनेचे प्रमुख यज्ञेश दवे यांनी केली आहे. 

राजपूत गारसिया समाज संघटनेच्या नेत्यांनीही ओबीसी आयोगाच्या सदस्यांची भेट घेऊन आरक्षणाची मागणी केली आहे. संघटनेचे नेते राजन चावडा यांनी याबाबतचे पत्रही आयोगाकडे दिले आहे. राजपुतांना नोकरी आणि शिक्षणामध्ये समान संधी दिली जात नाही. त्यांना मुख्यतः शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. इतर समाजांशी तुलना केल्यास आमच्या समाजातील कमावणाऱ्या महिलांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण देण्यात यावे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी आमच्या समाजाची लोकसंख्या आठ टक्के आहे. त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळावे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Brahmins in Gujarat demand reservation