नव्या भारतासाठी लक्ष्मणरेषा ओलांडा : पंतप्रधान

नव्या भारतासाठी लक्ष्मणरेषा ओलांडा : पंतप्रधान

नवी दिल्ली : "नवा भारत, आधुनिक भारत निर्माण करण्यासाठी राजकारणाची लक्ष्मणरेषा ओलांडावी,' असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापुढे समन्वय आणि संवादाचे संकेत विरोधकांना आज दिले. निमित्त होते राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तराचे. विरोधकांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या आवाजी मताने फेटाळण्यात येऊन राष्ट्रपतींचे आभार मानणारा प्रस्ताव लोकसभेत एकमुखाने संमत करण्यात आला. 

यापूर्वीच्या सर्व भाषणांमध्ये कॉंग्रेसवर कडवट शब्दांत टीका करणाऱ्या मोदींनी आजच्या एक तास दहा मिनिटे चाललेल्या भाषणात तुलनेने मवाळ पवित्रा स्वीकारल्याचे दिसले. कॉंग्रेसच्या सरकारांचे योगदान नाकारण्याचा होत असलेला आरोप आता पुरे, असा इशारा देताना मोदींनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आवर्जून उल्लेख केला. 
14 जुलै 1951 च्या कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यातील पंडित नेहरूंचा कर्तव्यपालनाचा संदेश त्यांनी उद्‌धृत केला. तसेच, नेहरूंचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांची इच्छा पूर्ण करावी, असे आवाहन केले. सोबतच आणीबाणीच्या स्मृती दिनानिमित्ताने कॉंग्रेसला चिमटे काढताना कॉंग्रेसमध्ये "परिवाराबाहेरच्यांना' (गांधी कुटुंबीय) काहीही मिळत नाही, असे वाक्‍बाणही सोडले. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दोघेही या वेळी सभागृहात हजर होते. 

"25 जूनला नेमके काय झाले, हे काहींना कळत नाही. ते आजूबाजूला विचारावे लागते,' असा टोला लगावताना मोदी म्हणाले की, 25 जूनच्या रात्री देशाचा आत्मा दडपला गेला. संपूर्ण देश कारागृह बनला होता. कुणाची तरी सत्ता जाऊ नये, यासाठी न्यायपालिकेचा अनादर करण्यात आला. संविधान दडपण्याचा प्रकार कोणीही विसरू शकत नाही. त्या पापात भागीदार असणाऱ्यांचा हिशेब कधीच संपणार नाही, असे ते म्हणाले. 

यूपीएच्या 2004 ते 2014 या सत्ताकाळात एकदाही वाजपेयींची प्रशंसा झाली काय, असा सवाल मोदींनी केला. कॉंग्रेसने अटलजी सोडाच; परंतु माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि डॉ. मनमोहनसिंग यांचेही नाव कधी घेतले नाही. देशाच्या प्रगतीत आतापर्यंतच्या सर्व सरकारांचे योगदान असल्याचे वारंवार सांगूनही प्रश्‍न उपस्थित केला जातो. ज्यांनी कधीच कुणाला स्वीकारले नाही; तेच लोक इतरांबाबत असे म्हणू शकतात; अन्यथा त्यांच्या काळात नरसिंह राव, डॉ. मनमोहनसिंग यांना भारतरत्न मिळाले असते. परंतु, "परिवाराबाहेरच्यांना काहीही मिळत नाही,' असा प्रहार मोदींनी केला. 

सोनिया, राहुल यांना तुरुंगात टाकून दाखवा, असे आव्हान कॉंग्रेसने काल दिले होते. त्यावरूनही मोदींनी फटकारले. कोणालाही ऊठसूट तुरुंगात टाकायला ही आणीबाणी नाही. ही लोकशाही असून, तुरुंगात पाठविण्याचे काम न्यायालयाचे आहे. जामिनावर बाहेर असणाऱ्यांनी या जामिनावरील स्वातंत्र्याचा आनंद घ्यावा. हीनभावनेतून काहीही करणार नाही, असे ते म्हणाले. 

कॉंग्रेसने धरणांचा उल्लेख करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले असते तर बरे झाले असते, असेही मोदींनी फटकारले. देशाने पाण्याच्या बाबतीत जे काही निर्णय केले; त्यात बाबासाहेबांचे योगदान होते, असे गौरवोद्गार काढताना मोदींनी "विशिष्ट उंचीवर पोचल्यानंतर खालचे काही दिसत नाही,' असा पुन्हा चिमटा काढला. 

मोदी म्हणाले... 
- राष्ट्रपतींनी अभिभाषणातून देशाच्या प्रगतीचा आराखडा मांडला आहे. 
- अनेक दशकांनंतर एखाद्या सरकारला असा मजबूत जनादेश मिळाला आहे. 
- "सर्वजन हिताय सर्वजन सुखाय' धोरणाला जनतेने अनुमोदन दिले. 
- कृषीमध्ये कॉर्पोरेट क्षेत्राची काहीही गुंतवणूक नाही. 
- ही गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच नवे नियम आखले जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com