
सीरमच्या लशीला मिळालेल्या मंजुरीनंतर आणखी एक आनंदाची बातमी भारतीयांना मिळत आहे.
नवी दिल्ली- सीरमच्या लशीला मिळालेल्या मंजुरीनंतर आणखी एक आनंदाची बातमी भारतीयांना मिळत आहे. स्वदेशी भारत बायोटकेच्या कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे नवीन वर्षांच्या सुरुवातीला सलग दोन दिवस भारतीयांना दोन आनंदाच्या बातम्या मिळाल्या आहेत.
स्वदेशी भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्याबाबात आज तज्ज्ञांची बैठक पार पडली. भारत बायोटेकची लस पहिली लस आहे जी देशातील सर्वोच्य आरोग्य संस्था आयसीएमआरच्या सहयोगाने बनवली जात आहे. भारत बायोटेकला मंजुरी मिळाल्याने ती पहिली स्वदेशी कोविड लस ठरली आहे.
ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर; विमानसेवा सुरु
विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच यासंबंधीच्या तज्ज्ञ समितीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्डद्वारा तयार केल्या जात असलेल्या कोविशिल्डला अंतिम मंजुरी देण्याची शिफारस ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाकडे केली आहे. आता भारत बायोटेकबाबतही मोठा निर्णय आला आहे. त्यामुळे कोरोना महामारीचं संकट भारतातून हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशातील तीन लस निर्मिती कंपन्यांनी लशीच्या आपात्कालीन मंजुरीसाठी अर्ज केले होते. यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाद्वारे निर्माण केली जाणारी कोविशिल्ड आणि भारत बायोटेक आणि आयसीएमआर ICMR द्वारे विकसित कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. फायझर-बायोएनटेकच्या लशीला जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिली आहे. फायझरने आपला डाटा देण्यासाठी तज्ज्ञ समितीला आणखी काही दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर फायझरच्या लशीलाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.