Hathras : जिल्हाधिकाऱ्यांचं निलंबन आणि SC च्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात व्हावा तपास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ते पीडित कुंटुंबाला धमकावताना दिसून येत आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या सामुहिक बलात्काराचे प्रकरण देशभरात चर्चेत आहे. या प्रकरणावरुन देशभरात संतापाची भावना असून आरोपींना कठोरात कठोर शासन व्हायला हवे, अशी मागणी सार्वत्रिक आहे. कालच राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी पोलिसांशी झटापट करत कसेबसे पीडितेच्या कुंटुंबियांना भेटण्यात यश मिळवले. मात्र, या प्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील पाच पोलिसांना निलंबित केल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांना देखील हटवण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. पीडितेच्या भावाने म्हटलंय की, हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही निलंबित केलं जावं. सोबतच सुप्रिम कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाअंतर्गत या प्रकरणाचा तपास व्हावा. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणातील पीडितेच्य भावाने म्हटलंय की, आमची अशी इच्छाय की, सुप्रिम कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाअंतर्गत तपास व्हावा. सोबतच हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित केलं जावं. 
काँग्रेसच्या महासचिव आणि पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी-वाड्रा यांनी हाथरस प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करुन त्यांनी घेतलेल्या भुमिकेचा तपास करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - भारत-चीन संघर्ष मिटणार? पुढील आठवड्यात पुन्हा लष्करी चर्चा

प्रियंका गांधी यांनी रविवारी ट्विट केलं आहे की, हाथरसच्या पीडित कुंटुंबाच्या म्हणण्यानुसार त्यांच्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी वाईट वर्तन केलं आहे. त्यांना कोण वाचवत आहे? त्यांना उशीर न करता निलंबित करण्यात यावं आणि या प्रकरणात त्यांच्या एकूण भुमिकेचाही तपास व्हावा. 

हेही वाचा - शासनाच्या प्रयत्नांनी बलात्कार थांबणार नाहीत, मुलींवर चांगले संस्कार करा; भाजप आमदाराची मुक्ताफळे

या प्रकरणावरुन देशभर राळ उठल्यानंतर गेल्या शुक्रवारी राज्य सरकारने तिथल्या पोलिस अधिक्षकांसहित पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं गेलं आहे. या दरम्यानच, जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात ते पीडित कुंटुंबाला धमकावताना दिसून येत आहेत. म्हणूनच, त्यांनाही हटवण्याची मागणी जोर धरत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brother of hathras gangrape victim demands investigation under retired SC judge