'त्या' जवानाची स्वेच्छानिवृत्ती रद्द करुन केली अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

बीएसएफने मात्र यादव यांना अटक करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. तसेच यादव यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

रेवाडी - लष्करात मिळत असलेल्या जेवणाचा पंचनामा करणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादुर यादव यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज रद्द करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

तेज बहादूर यादव यांनी सीमेवर तैनात असताना मिळत असलेल्या जेवणाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्यांनी जवानांना मिळत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाचे चित्रिकरण केले होते. या व्हिडिओमुळे देशभर खळबळ उडाल्यानंतर सरकारनेही चौकशीचे आदेश दिले होते. तर, बीएसएफने त्या जवानाची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे म्हटले होते. आता यादव यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्यानंतर चौकशी पूर्ण होईपर्यंत स्वेच्छानिवृत्ती घेण्यास नकार देण्यात आला आहे. तसेच त्यांना अटक करण्यात आली आहे.

यादव यांच्या पत्नी शर्मिला यांनी म्हटले आहे, की त्यांनी दुसऱ्याच्या फोनवरून मला फोन करत सांगितले की मला अटक करण्यात आली आहे. तसेच माझा मानसिक छळ करण्यात येत आहे. त्यांना 31 जानेवारीला स्वेच्छानिवृत्ती मिळणार होती, पण ती रद्द करण्यात आली. 

बीएसएफने मात्र यादव यांना अटक करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. तसेच यादव यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

Web Title: BSF jawan's viral video: Wife alleges Tej Bahadur under arrest, being mentally tortured