उद्यांनामधील पुतळे ही तर जनतेची इच्छा : मायावती

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 एप्रिल 2019

उद्यांनामध्ये माझे पुतळे उभारावेत ही जनतेची इच्छा होती. विधानसभेतील चर्चेनंतर मुर्ती, पुतळे लावण्यात आली. त्यासाठी विधिमंडळात अंदाजपत्रकही संमत करण्यात आले होते. माझे पुतळे उभारणे ही जनभावना होती.

लखनौः उद्यांनामध्ये माझे पुतळे उभारावेत ही जनतेचीच इच्छा होती, असे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) अध्यक्ष मायावती यांनी मुर्तींवर केलेल्या खर्चावरुन सर्वोच्च न्यायालयाला उत्तर दिले आहे.

मायावती यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, उद्यांनामध्ये माझे पुतळे उभारावेत ही जनतेची इच्छा होती. विधानसभेतील चर्चेनंतर मुर्ती, पुतळे लावण्यात आली. त्यासाठी विधिमंडळात अंदाजपत्रकही संमत करण्यात आले होते. माझे पुतळे उभारणे ही जनभावना होती. त्याचबरोबर बसपाचे संस्थापक काशीराम यांचीही इच्छा होती. दलित आंदोलनातील माझ्या योगदानाची दखल घेऊन हे पुतळे उभारण्यात आले आहेत. यामुळे पैसे परत करण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही.

पुतळ्यावर खर्च केलेला पैसा मायावतींकडून वसूल केला पाहिजे का?, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाच्या सुनावणीवेळी केला होता. 8 फेब्रुवारीला खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले होते की, मायावतींनी पुतळ्यांवर केलेला खर्च सरकारी खजिन्यात जमा केला पाहिजे, असा न्यायालयाचा विचार आहे. याप्रकरणातील याचिकाकर्ते रविकांत यांनी मायावती आणि हत्ती यांच्या पुतळ्यांवर झालेला खर्च बसपाकडून वसूल करण्याची मागणी केली होती. ही जनहित याचिका 2009 मध्ये दाखल करण्यात आली होती. सार्वजनिक पैशांचा वापर स्वत:चे पुतळे उभारणे आणि त्याचा राजकीय प्रचारासाठी केला जाऊ शकत नाही, असे त्यांनी याचिकेत म्हटले होते.

पुतळ्यांवर खर्च झालेला पैसा शिक्षणासाठी किंवा रूग्णालयांसाठी वापरावा का? हा वादाचा मुद्दा आहे. लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून स्मारक आणि मूर्त्या उभारल्याचही मायावतींनी म्हटले आहे. हत्तींची केवळ शिल्प आहेत. त्यात बसपाच्या चिन्हाचा प्रचार करण्याचा प्रश्नचं नाही, असे स्पष्टीकरणही मायावतींनी दिले आहे.

Web Title: BSP chief Mayawati justifies installation of her statues in UP