बदायूं हत्याकांड : 50 हजाराचे बक्षिस लावलेल्या फरार पुजाऱ्याला अटक; गावातच बसला होता लपून

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021

गेल्या रविवारी संध्याकाळी उघैती भागातील 45 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या झाली होती.

लखनऊ : बदायूं जिल्ह्यातील उघैती गावामध्ये घडलेल्या नृशंस हल्ल्यावर आता तीव्र पडसाद उमटत आहेत. सामुहिक बलात्कारानंतर जखमी महिलेला अत्यावस्थ अवस्थेत सोडून पोबारा करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकरवी सुरु होता. या प्रकरणातील फरार मुख्य संशयित आरोपी मंदिराचा पुजारी असून त्याला पकडण्यासाठी 50 हजार रुपयांचे बक्षिस देखील जाहीर करण्यात आले होते. काल गुरुवारी या फरार पुजाऱ्याला गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. हा  पुजारी उघैतीमधीलच मेवली गावामध्ये एका महिलेच्या घरी लपून बसला होता.

हेही वाचा - Farmer Protest : शक्तीप्रदर्शनानंतर चर्चेची 8वी फेरी: बाबा लक्खा सिंग यांची कृषी मंत्र्यांशी भेट

गेल्या रविवारी संध्याकाळी उघैती भागातील 45 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. मात्र यातील मुख्य आरोपी असलेला पुजारी अद्याप फरार होता. त्याचा तपास सुरु होता. बदायूं पोलिसांनी संपूर्ण उघैती भागात नाकेबंदी केली होती. गुरुवारी रात्री जवळपास 10 वाजता मेवली गावातील लोकांना एका महिलेच्या घरी एका व्यक्तीच्या लपून बसण्याची माहिती मिळाली होती. गावातील लोकांनी जेंव्हा महिलेला याबाबत विचारणा केली तेंव्हा तिने नकार दिला. मात्र, संशय आल्यावर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं.

45 वर्षीय अंगनवाडी सेविकेवर सामुहिक बलात्कारानंतर तिची  हत्या करण्यात आली होती. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या महिलेवर अनन्वित अत्याचार झाल्याचे समोर आले होते. तिच्या गुप्तांगावर जखमा झाल्या होत्या. तसेच तिची बरगडी आणि पायाचे हाड तुटले होते. तिच्या फुप्फुसावर देखील वार करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी पुजारी सत्यनारायण दास, त्याचा सहकारी वेदराम आणि यशपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. वेदराम आणि यशपाल यांना अटक करुन तुरुंगात पाठवले होते तर फरार आरोपी सत्यनारायण दासवर 50 हजाराचे बक्षिस लावण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: budaun case main mahant satyanarayan accused arrested