पूरग्रस्तांना जागेसह घरे बांधून देणार : येडियुरप्पा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 August 2019

तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांची निवारा केंद्रांमध्ये सर्वतोपरी सोय केली आहे. वेळप्रसंगी आपत्तीजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व तयारी केली आहे. 

निपाणी : तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांची निवारा केंद्रांमध्ये सर्वतोपरी सोय केली आहे. वेळप्रसंगी आपत्तीजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व तयारी केली आहे. महापुरामुळे निराश्रित झालेल्या पूरग्रस्तांना जागेसह घरे बांधून देण्यात येणार आहेत. शिवाय पुराचे पाणी कमी झाल्यानंतर नुकसानग्रस्त घरासह शेती व पिकांचे सर्वे करून लाभार्थींना योग्य ती भरपाई देण्यात येणार असल्याची ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली. 

मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे यमगर्णी येथील निवारा केंद्रास भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार शशिकला जोल्ले, माजी मंत्री उमेश कत्ती, माजी खासदार रमेश कत्ती उपस्थित होते. 

मुख्यमंत्री येडीयुरप्पा म्हणाले, 'निपाणी तालुक्यात होत असलेल्या अतिवृष्टीसह विविध धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे तालुक्याला पुराने वेढा घातला आहे. त्यामुळे नदी काठावरील अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. सध्या पूरनियंत्रणासाठी व पूरग्रस्तांसाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.  नदीकाठची जमीन व पिके मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेली आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर महसूल खात्यातर्फे पीक नुकसानी बरोबरच पडझड झालेल्या घरांचा सर्वे निपक्षपातीपणे केला जाईल. त्यानंतर सर्वच नुकसानग्रस्तांना योग्य ती मदत देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पूरग्रस्तांना धीर न सोडता शासकीय यंत्रणेचा उपयोग करून घेऊन पूरपरिस्थिती कमी होईपर्यंत निवारा केंद्रात राहावे. '

दौऱ्यासाठी अडविला महामार्ग

मुख्यमंत्री येडियुराप्पा हे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास यमगर्णी येथील निवारा केंद्रासह महामार्गावर आलेल्या पाण्याच्या ठिकाणी भेटणार होते त्या पार्श्वभूमीवर दुपारी बारा वाजल्यापासूनच अकोळ क्राॅस, कोल्हापूर वेस, भोईटे हॉटेल उड्डाणपूल, शिंदे नगर क्रॉसवर पोलिसांनी महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे यमगरणी पर्यंत जाणाऱ्या वाहनधारकास प्रवाशांना सुमारे दीड तास त्रास सहन करावा लागला. 

पूरग्रस्तापेक्षा नागरिकच जास्त

मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे पूरग्रस्तांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले असताना निवारा केंद्रावर पूरग्रस्तापेक्षा कार्यकर्ते आणि नागरिकच मोठ्या प्रमाणावर जमले होते. त्यामुळे खऱ्या पूरग्रस्तांना भेटीपासून दूरच राहावे लागले. तसेच निवारा केंद्रात औषध घेऊन जाणाऱ्या नागरिकांनाही अडवण्यात आले होते. अखेर मंडळ पोलीस निरीक्षक संतोष सत्य नायक त्यांनी सर्वच पूरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Build houses to flood victims says B S Yediyurappa