बिहारमधील कारागृहातून 5 कैद्यांचे पलायन

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

बक्सरमधील मध्यवर्ती कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या चार कैद्यांसह पाच कैद्यांनी पलायन केले. शुक्रवारी मध्यरात्री कारागृहातून कैदी पळाले असल्याचे अधिकाऱ्यांना आज पहाटे लक्षात आले.

पाटणा - बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील कारागृहातून पाच कैद्यांनी शुक्रवारी मध्यरात्री पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. या कैद्यांच्या शोधासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.

बक्सरमधील मध्यवर्ती कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या चार कैद्यांसह पाच कैद्यांनी पलायन केले. शुक्रवारी मध्यरात्री कारागृहातून कैदी पळाले असल्याचे अधिकाऱ्यांना आज पहाटे लक्षात आले. त्यानंतर या कैद्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके बनवून शोध घेण्यात येत आहे.

कैदी पळाल्याने आसपासच्या भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून, बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कारागृहाची भींत ओलांडून या कैद्यांनी पलायन केल्याचे समोर आले आहे. लोखंडी रॉड, पाईप आणि धोती अशी वस्तू याठिकाणी सापडल्या आहेत.

पलायन केलेल्या कैद्यांमध्ये जन्मठेप झालेले मोतीहारी, गिरधारी राय, सोनू पांडे आणि उपेंद्र सह या चौघांचा समावेश आहे. तर, सोनू सिंह याला दहा वर्षांची शिक्षा झालेली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक उपेंद्र शर्मा यांनी दिली.

Web Title: Buxar jailbreak: five prisoners escape