दिल्लीत सीएएचा वणवा कायम; हिंसाचारात पोलिस कर्मचारी ठार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

  • आंदोलन पेटले
  • गाड्यांना आगी लावल्या
  • पोलिस उपायुक्त जखमी

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीच्या मौजपूर आणि जाफराबाद भागात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी सीएए समर्थक आणि विरोधी गटात उसळलेल्या हिंसाचारात पोलिस कॉन्स्टेंबल ठार झाला तर अन्य एका घटनेत पोलिस उपायुक्तांसह अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. आंदोलकांनी घरे, गाड्या आणि दुकानाची नासधूस करत आगी लावल्या. आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांनी लाठीमार केला तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. चांदबाग, भजनपुरा भागातही आंदोलनकर्त्यांनी काही ठिकाणी आग लावण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कालप्रमाणे आजही मौजपूर भागात हिंसाचार उसळला. सीएए समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांवर आज सकाळी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मौजपूर मेट्रो स्थानकाच्या नजीक कबीरनगर भागात हिंसा उसळल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दिल्ली मेट्रोने परिस्थिती तणावपूर्ण असल्याने जाफराबाद आणि मौजपूर-बाबरपूर स्थानकावर प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद केले. त्यामुळे या स्थानकावर मेट्रो थांबल्या नाहीत. यासंदर्भात डीएमआरसीने ट्विट करत म्हटले, की जाफराबाद आणि मौजपूर-बाबरपूर मेट्रो स्थानकाचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद केले असून, तेथे मेट्रो थांबणार नाही. येत्या चोवीस तासांपर्यंत दोन्ही प्रवेशद्वार बंद राहणार आहेत. तत्पूर्वी काल सीएएविरोधात आंदोलनकर्त्यांनी मोठा हिंसाचार घडवून आणला. त्यानंतर जाफराबादमध्ये सीएए समर्थक आणि विरोधकात धुमश्‍चक्री झाली. मौजपूर येथे भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी सभेचे आयोजन केले होते. त्यात तीन दिवसांत सीएए विरोधातील आंदोलनकर्त्यांना बाजूला काढण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली होती. या सभेनंतर दोन गटांतील सदस्यांनी एकमेकावर दगडफेक सुरू केली.

ट्रम्प म्हणतात, दहा वर्षात होणार भारतातील गरिबी दूर

हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू
दिल्लीतील हिंसाचारात आज एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, रतनलाल असे त्या मृत हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. एसीपी गोकलपुरी कार्यालयात ते सेवारत होते. तसेच शहादराचे पोलिस उपायुक्त अमित शर्मासह अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. ते आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले. शर्मा यांच्या हाताला मार लागला असून त्याच्यावर उपचार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. परिस्थिती चिघळू नये यासाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. मौजपूर येथे आंदोलकांनी प्रचंड दगडफेक केली. तसेच जाफराबाद येथे पोलिसांना लाठीमार करावा लागला. मौजपूर, चांदबाग आणि भजनपुरा येथे आंदोलकांनी गाड्या जाळल्या, घराला आगी लावल्या. दुकानाची नासधूस करत हिंसाचार घडवून आणला.

केजरीवाल यांचे आवाहन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि गोपाल राय यांनी नायब राज्यपाल बैजल यांना दिल्लीत शांतता राखण्यासाठी योग्य उपाय करण्याचे आवाहन केले आहे. त्यावर नायब राज्यपालांनी सुरक्षा दलांना योग्य सूचना दिल्याचे ट्विटरवर म्हटले आहे. दिल्लीतील काही भागात तणाव असल्याचे वृत्त असून, राज्यपाल आणि गृहमंत्र्यांनी राजधानीत शांतता राहण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हस्तक्षेप करावा असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले आहे.

राजधानीत दिवसभरात
जाफराबाद-मौजपूर येथे तणाव कायम
आंदोलकांकडून अग्निशन दलाच्या बंबाची नासधूस
जाफराबाद-मौजपूर-बाबरपूर स्थानकाचे प्रवेशद्वार बंद
दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांचे शांततेचे आवाहन
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAA protests Policeman among two killed in northeast Delhi violence