esakal | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डझनभर मंत्र्यांना दिला नारळ
sakal

बोलून बातमी शोधा

Ministers

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डझनभर मंत्र्यांना दिला नारळ

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या विस्तारास (Expansion) मूर्तरूप देताना १२ मंत्र्यांना (Minister) नारळ दिला आहे. मुख्यतः मंत्री म्हणून कामगिरी व वय यांच्या निकषावर त्यांना डच्चू मिळाला ही ठळक कारणे आहेत. (Cabinet Reshuffle 12 Ministers Including Javadekar And Ravi Shankar Prasad Exit Modi Government)

कोरोनानंतर मोदी यांचे धोरण ‘कॅच देम यंग'' असे असल्याचे सांगितले जाते. शिवाय दिल्लीसारख्या छोट्या राज्यांबाबत १ राज्य १ महत्त्वाचे मंत्रिपद हे धोरण राबविण्याची पंतप्रधानांची इच्छा आहे.

हेही वाचा: मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्य मंत्री; जाणून घ्या इतर खाती कोणाकडे?

सुप्रियो, चौधरी

पर्यावरण राज्यमंत्री बाबूल सुप्रियो व महिला बालविकास राज्यमंत्री देबश्री चौधरी यांना पश्चिम बंगालमधील पराभवाचा फटका बसल्याचे सांगितले जाते. सुप्रियो कायम फिल्मी देहबोलीत वावरत असतात व मोदी पंतप्रधान झाल्यावर गांधी स्मृती येथील पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी फिल्मी गाणे गायल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता.

संजय धोत्रे

निशंक यांच्याबरोबरच त्यांचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांचीही सुटी झाली. धोत्रे सुरवातीपासूनच तेथे अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. निशंक कोरोनातून पूर्ण तंदुरस्त झालेले नाहीत.याशिवाय त्यांनी सीबीएसई बोर्डाच्या तसेच नीटसारख्या स्पर्धा परीक्षांबाबत जो घोळ सुरू केला होता तो निस्तरण्यासाठी स्वतः पंतप्रधानांना बैठक घ्यावी लागली.

डॉ. हर्षवर्धन

मोदींच्या पहिल्या कार्यकाळात नड्डांकडे आरोग्य मंत्रिपद होते. कोरोना काळात ऑक्सिजन, लसटंचाईने सरकारच्या म्हणजे पंतप्रधानांच्या म्हणजेच देशाच्या प्रतिमेला हादरे बसतानाही ‘...मेरी इमेज ना खराब हो’, या उक्तीनुसार डॉ. हर्षवर्धन यांनी आवश्यक आक्रमकता दाखविली नसल्याचा आक्षेप आहे. त्यांनी आरोग्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याकडील विज्ञान-तंत्रज्ञान हे खाते अद्याप कायम आहे का, याबाबत धूसरता आहे.

हेही वाचा: मोदींच्या मेगा कॅबिनेटमध्ये नारीशक्तीचा गौरव!

संतोष गंगवार

श्रममंत्री संतोष गंगवार हे भाजपच्या जुन्या पठडीतील नेते होते. अलीकडे कामगार कायद्यांत सुधारणा करताना त्यांनी अपेक्षित गती दाखविली नसल्याचे सांगितले जात होते.

रमेश पोखरीयाल निशंक

मोदी सरकार ज्या एका खात्यासाठी सुयोग्य मंत्रीच मिळत नसल्याची चर्चा आहे त्यात शिक्षण व माहिती प्रसारण या प्रमुख मंत्रालयाचा समावेश आहे. मोदींनी तर आतापावेतो स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर व आता निशंक तसेच महेंद्रनाथ पांडे व संजय धोत्रे असे किमान ५ शिक्षणमंत्री-राज्यमंत्री बदलले आहेत.

सदानंद गौडा

२०१४ मध्ये रेल्वे मंत्रालय सांभाळणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना उदासीन कारभार भोवला.त्यांचे रेल्वे मंत्रिपद बदलून सामाजिक न्यायमंत्री केले गेले. तेथून खत व रसायन मंत्रालयात बदली झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मागे क्लेश सुरू केल्याची चर्चा आहे.

या मंत्र्यांची गच्छंती

थावरचंद गेहलोत (समाजकल्याण), डॉ. हर्षवर्धन (आरोग्य), रमेश पोखरियाल निशंक (शिक्षण), देबश्री चौधरी (महिला), सदानंद गौड़ा (खते), प्रकाश जावडेकर (माहिती, नभोवाणी) संतोष गंगवार (श्रम राज्य), संजय धोत्रे (शिक्षण राज्य), बाबुल सुप्रियो, प्रतापचंद्र सारंगी, रतनलाल कटारिया, रवीशंकर प्रसाद (कायदा)

loading image