
बिहारची राजधानी पाटणामधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Bihar Politics : बिहारची राजधानी पाटणामधून (Patna) एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी बिहार मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Bihar Cabinet Expansion) मोठी माहिती दिलीय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, बिहार मंत्रिमंडळाचा विस्तार 15 ऑगस्टनंतर म्हणजेच, स्वातंत्र्यदिनानंतर होणार आहे.
बिहार मंत्रिमंडळाचा विस्तार 16 ऑगस्ट रोजी किंवा नंतर होऊ शकतो, असं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलंय. बिहारमध्ये दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये बुधवारी महागठबंधनचं सरकार स्थापन झालं. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची, तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय.
आता अशा परिस्थितीत नितीशकुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि त्याचं स्वरूप काय असणार, या चर्चेला उधाण आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावं जवळपास निश्चित झाली आहेत. बिहार सरकारमध्ये आरजेडीचे 16 ते 18 मंत्री असतील, तर काँग्रेसला 3 किंवा 4 पदं मिळू शकतात. तर, जितन राम मांझी यांच्या पक्षाला मागील सरकारप्रमाणंच या सरकारमध्येही एक जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अपक्ष आमदार सुमित सिंह यांनाही नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात पुन्हा मंत्री होण्याची संधी मिळू शकते.