'भन्साळी जर्मनीत हिटलरविरुद्ध चित्रपट बनवतील का?'

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

जयपूर (राजस्थान) - दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांना मारहाण केल्याच्या घटनेचे समर्थन करत राजपूत करनी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कलवी यांनी "संजय लिला भन्साळी यांच्यात जर्मनीमध्ये हिटलरविरुद्ध चित्रपट बनविण्याची हिंमत आहे का?', असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

जयपूर (राजस्थान) - दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांना मारहाण केल्याच्या घटनेचे समर्थन करत राजपूत करनी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कलवी यांनी "संजय लिला भन्साळी यांच्यात जर्मनीमध्ये हिटलरविरुद्ध चित्रपट बनविण्याची हिंमत आहे का?', असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

जयपूरमध्ये भन्साळी दिग्दर्शित "पद्मावती' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रपटात काही चुकीच्या गोष्टी दाखविण्यात येत असल्याचे म्हणत राजपूत सेना करनीच्या कार्यकर्त्यांनी चित्रीकरणाचा सेट उध्वस्त करत भन्साळींवर हल्ला केला. या पार्श्‍वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना कलवी म्हणाले, "आमच्या डोळ्यासमोर ते आमच्या पूर्वजांचा इतिहास बदलत आहेत. आम्ही यापूर्वी "जोधा-अकबर'च्या वेळीही हेच सांगितले होते. जे इतिहासात नाही ते चित्रपटात दाखविले जाऊ नये.'

दरम्यान, राजस्थानचे गृहमंत्री गुलाम सिंह कटारिया यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'अशा प्रकारात राग येणे स्वाभाविक आहे. मात्र कायदा मोडून राग व्यक्त केला जाऊ नये. कायदा हातात घेण्यापेक्षा त्यांनी पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती' अशा शब्दांत हल्ल्याचा निषेध करत कटारिया यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगितले. "पद्मावती' चित्रपटात राणी पद्ममिनी आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यातील प्रेमप्रसंगांवर राजपूत सेनेने आक्षेप घेतला आहे. या भूमिका अनुक्रमे दीपिका पदुकोन आणि रणवीरसिंग करत आहेत.

ट्‌विटरवर #SanjayLeelaBhansali ट्रेंड
भन्साळींवरील हल्ल्याबाबत नेटिझन्सकडून सोशल मिडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळेच आज ट्‌विटरवर #SanjayLeelaBhansali हा ट्रेंड "टॉप ट्रेंड'मध्ये आढळून आला आहे. नेटिझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असून चित्रपट सृष्टीतून हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे.

Web Title: Can Bhansali make a film against Hitler in Germany - Kalvi