पंतप्रधानांचा 'कॅशलेस' अर्थव्यवस्थेचा मंत्र

वृत्तसंस्था
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले असताना, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला "कॅशलेस इकॉनॉमी'चा मंत्र दिला. नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास होईल, हे मी आधीच सांगितले होते. सत्तर वर्षांपूर्वीच्या आजारावरील इलाज एवढा सोपा असू शकत नाही. "माझा मोबाईल, माझी बॅंक आणि माझा बटवा' ही त्रिसूत्री स्वीकारण्याची वेळ आली आहे. लोकांना आता "ई-बॅंकिंग' आणि "मोबाईल बॅंकिंग' सेवेचा स्वीकार करावा लागेल, असेही मोदी यांनी सांगितले. नोटाबंदीचा निर्णय मोठा असून, त्यातून सावरण्यासाठी किमान पन्नास दिवस तरी लागतील, असे मी याआधीच सांगितले होते.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले असताना, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला "कॅशलेस इकॉनॉमी'चा मंत्र दिला. नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास होईल, हे मी आधीच सांगितले होते. सत्तर वर्षांपूर्वीच्या आजारावरील इलाज एवढा सोपा असू शकत नाही. "माझा मोबाईल, माझी बॅंक आणि माझा बटवा' ही त्रिसूत्री स्वीकारण्याची वेळ आली आहे. लोकांना आता "ई-बॅंकिंग' आणि "मोबाईल बॅंकिंग' सेवेचा स्वीकार करावा लागेल, असेही मोदी यांनी सांगितले. नोटाबंदीचा निर्णय मोठा असून, त्यातून सावरण्यासाठी किमान पन्नास दिवस तरी लागतील, असे मी याआधीच सांगितले होते. देशातील जनता हा उपक्रम यशस्वी करून दाखवेल, असा विश्‍वास त्यांनी आज "मन की बात' या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

नोटाबंदीच्या मुद्द्यावरून काही लोक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असताना, जनतेने मात्र याचा स्वीकार केला. संपूर्ण जगाला हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे पाऊल वाटते. काही मंडळींनी आपले काळे पैसे बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी गरिबांना पुढे केले, असेही त्यांनी नमूद केले. लोकांनी परस्परांना कशा पद्धतीने मदत केली याचे उदाहरण देताना मोदी म्हणाले, की महाराष्ट्रातील अकोल्यातील एका उपहारगृहाने नोटाबंदीनंतर ज्या लोकांकडे पैसे नाहीत अशांना मोफत नाश्‍ता दिला. शेतकऱ्यांनीदेखील या समस्येतून मार्ग काढत व्यवहार केले. मी छोट्या व्यापाऱ्यांना "कॅशलेस' अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. यामुळे देशात मोठे स्थित्यंतर होणार असल्याचे सांगत मोदी यांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणावर पेरणी झाल्याचे नमूद केले.

लोकांचा पाठिंबा
लोकांचा या निर्णयास पाठिंबा होता, हा उपक्रम यशस्वी व्हावा म्हणून अनेकांनी योगदान दिले. "कॅशलेस' अर्थव्यवस्था ही पूर्णपणे वेगळी बाब असल्याचे मला माहिती आहे. तरुण हेच बदलाचे एजंट आहेत. त्यामुळे तरुणांनीच पुढाकार घेऊन लोकांमध्ये डिजिटल व्यवहाराबाबत जागृती आणावी. संगणकाच्या विविध टूल्सचा वापर करत कशा पद्धतीने कॅशलेस अर्थव्यवस्था आणता येईल याचा विचार करावा, असे आवाहनही मोदी यांनी या वेळी केले.

गरिबांसाठी निर्णय
हा निर्णय देशातील गरीब, शेतकरी, कामगार आणि अन्य शोषित घटकांसाठी घेण्यात आला आहे. कामगारांना पुरेसे वेतन दिले जात नाही. जेवढ्या वेतनाची कागदावर नोंद केली जाते तेवढेदेखील त्यांना मिळत नाही. आता या लोकांची बॅंकांमध्ये खाती उघडली जाणार असल्याने बऱ्याच समस्यांचे निराकरण होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. "रुपे कार्ड'चा गरिबांकडून होणारा वापर तीनशे टक्‍क्‍यांनी वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.

हीच योग्य वेळ
लघू उद्योगात असणाऱ्या लोकांनी डिजिटल जगतामध्ये पदार्पण करण्याची हीच योग्य वेळ आहे. डिजिटल आर्थिक व्यवहारांची माहिती झाली, तर सामान्य माणसांच्या समस्यादेखील अनेक पटीने कमी होतील आणि हे काम तरुण तातडीने करू शकतात. तरुणांनी या उपक्रमास केवळ पाठिंबा देऊन थांबू नये, तर या बदलासाठी त्यांनी सैनिक व्हावे. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशापासून मुक्त भारतासाठी आम्ही संघर्ष करू, असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला.

काश्‍मिरी तरुणांचे कौतुक
जम्मू-काश्‍मीरमध्ये बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या तरुणांची संख्या 95 टक्‍क्‍यांवर पोचली असून, ही बाब आनंददायी आहे. यावरून काश्‍मिरी तरुणदेखील चांगल्या भवितव्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येते. काश्‍मीरमधील मुलांनाही उज्ज्वल भवितव्य असल्याचे मोदी यांनी सांगितले. मध्यंतरी मोदी यांनी काश्‍मिरी प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली होती. या वेळी आपण काश्‍मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांचे बोल

  • विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न
  • जगभरात नोटाबंदीच्या निर्णयाचे विश्‍लेषण सुरू
  • भारत यातून सोन्यासारखा तावूनसुलाखून बाहेर पडेल.
  • काळा पैसा वाचविण्यासाठी काहींकडून गरिबांच्या जन धन खात्यांचा गैरवापर
  • बेनामी संपत्तीसाठी कठोर कायदा लागू होणार
Web Title: Cashless economy suggestion of PM