esakal | कोण आहेत CBI चे नवे प्रमुख; जयस्वाल यांचे महाराष्ट्राशी खास कनेक्शन
sakal

बोलून बातमी शोधा

कोण आहेत CBI चे नवे प्रमुख; महाराष्ट्राशी खास कनेक्शन

बिहारचे असलेले सुबोध कुमार जयस्वाल हे वयाच्या 23 व्या वर्षी आयपीएस अधिकारी झाले होते. जयस्वाल यांनी देशाची गुप्तचर संस्था रॉमध्ये अनेक महत्त्वाच्या मोहिमेत काम केलं.

कोण आहेत CBI चे नवे प्रमुख; महाराष्ट्राशी खास कनेक्शन

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अध्यक्षतेखालील समितीने सोमवारी बैठक घेतली होती. त्यानंतर मंगळवारी जयस्वाल यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सुबोध जयस्वाल हे सध्या सीआयएसफचे डायरेक्टर जनरल आहेत. सुबोध कुमार जयस्वाल हे बिहारचे असून महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांचे महाराष्ट्राशी खास असं नातं आहे. राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. आता सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नियुक्तीने महाराष्ट्र सरकार आणि सीबीआय यांच्यात पुन्हा वादाच्या ठिणग्या पडणार का अशी चर्चा रंगली आहे. त्याला कारण म्हणजे सुबोध कुमार जयस्वाल यांनी ठाकरे सरकारने राज्यातील पोलिसांच्या बदल्यांवर व्यक्त केलेली नाराजी ही आहे. तसंच गेल्या वर्षभरात राज्यात सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणांसह इतर कारणांनी सीबीआय आणि राज्य सरकार हे सातत्यानं एकमेकांविरोधात समोर आले आहेत.

सुबोध कुमार जयस्वाल हे मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी एक वर्ष आणि महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक म्हणून दोन वर्षे कार्यरत होते. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात त्यांची नियुक्ती झाली होती. मात्र राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर त्यांच्याशी मतभेद झाले. मुंबईचे पोलिस आयुक्त होण्याआधी जयस्वाल हे सेंट्रल डेप्युटेशनवर होते. तसंच महाराष्ट्र एटीएस प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. ‘रॉ’मध्येही त्यांनी काम केलं आहे. तेलगी घोटाळा ते मालेगाव बॉम्बस्फोट, 26/11 हल्ला यांच्या तपासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हेही वाचा: "थरुर यांच्याकडून देशाच्या प्रतिमेला धक्का, खासदारकी रद्द करा"

बिहारचे असलेले सुबोध कुमार जयस्वाल हे वयाच्या 23 व्या वर्षी आयपीएस अधिकारी झाले होते. जयस्वाल यांनी देशाची गुप्तचर संस्था रॉमध्ये अनेक महत्त्वाच्या मोहिमेत काम केलं. रॉसाठी काम करताना त्यांनी देशाच्या बाहेरही काही मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

पंतप्रधानांची सुरक्षा पाहणाऱ्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्येही जयस्वाल यांचा समावेश करण्यात आला होता. त्यांनी सहायक महानिरीक्षकांसह इतर पदांवर केलेल्या कामाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मंत्रालय सचिवालयात त्यांनी अतिरिक्त सचिव आणि संयुक्त सचिव म्हणूनही काम केलं आहे. जयस्वाल यांना त्यांच्या कामगिरीसाठी 2001 मध्ये राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात आलं आहे.

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक म्हणून जबाबदारी घेण्याआधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास केला आहे. यामध्ये तेलगी मुद्रांक शुल्क घोटाळ्याच्या तपासाचा समावेश आहे. तसंच राज्य राखीव पोलिस दलाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. 2006 मधील मालेगाव बॉम्बस्फोट, मुंबईवरील 26/11 चा हल्ला यांसह अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास त्यांनी मुंबईत केला.

हेही वाचा: आरे CEO च्या घरात कचऱ्यात सापडले ३.५ कोटी रुपये

महाराष्ट्रात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर सुबोध जयस्वाल यांचा आक्षेप होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर जयस्वाल नाराज असल्याचं सांगितलं जात होतं.

सीबीआयचे डेप्युटी चीफ राकेश अस्थाना यांच्याशी झालेल्या वादानंतर सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांना हटवण्यात आले होते. यानंतर ऋषी कुमार शुक्ला यांच्याकडे सीबीआयची सूत्रे सोपवली. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून शुक्ला फेब्रुवारीत निवृत्त झाले. त्यानंतर गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी प्रवीण सिन्हा सीबीआयचे प्रभारी प्रमुख म्हणून काम बघत होते.