कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्र्याला 3 वर्षांचा कारावास

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कोळसा मंत्री होते.

नवी दिल्ली- कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांच्यासह तिघांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने 1999 मध्ये झारखंडमधील एका कोळसा खाणीच्या वाटपातील अनियमतता संबंधित कोळसा घोटाळ्याप्रकरणी दिलीप रे यांना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नुकताच त्यांना दोषी ठरवले होते. 

विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी शिक्षा सुनावताना सर्व दोषींना 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दिलीप रे यांच्याशिवाय कोळसा मंत्रालयाचे दोन तत्कालीन वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार बॅनर्जी आणि नित्यानंद गौतम, केस्ट्रोन टेक्नॉलॉजी लि.चे (सीटीएल) संचालक महेंद्रकुमार अग्रवाल आणि केस्ट्रॉन मायनिंग लि.लाही (सीएमएल) दोषी ठरवले होते. न्यायालयाने सीटीएल 60 लाख रुपये तर सीएमएलला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 

हेही वाचा- कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याकडे अन्न आणि शस्त्रास्त्रेही नव्हते, नवाझ शरीफांची पहिल्यांदाच कबुली

कोण आहेत दिलीप रे

दिलीप रे हे बिजू जनता दलाचे (बीजेडी) संस्थापक सदस्य आहेत. बिजू पटनायक यांच्या ते अत्यंत निकटवर्तीय होते. परंतु, नंतर त्यांनी आपला पक्ष बदलला आणि ते भाजपत सहभागी झाले. 2014 मध्ये भाजपच्या तिकीटीवर ते राऊरकेला येथून विधानसभेवर गेले. 2019 मध्ये निवडणुकीआधी त्यांनी भाजपचा त्याग केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप केला. 

हेही वाचा- 'लस राष्ट्रवादा'वरुन WHO चा गंभीर इशारा; सर्व देशांना केले आवाहन

भाजपचा त्याग केल्यानंतर ते आपला पूर्वीचा पक्ष बीजेडीमध्ये दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र ते राजकारणापासून दूर राहिले. आता कोळासा घोटाळ्याप्रकरणी त्यांना 3 वर्षांची शिक्षा झाली आहे. दरम्यान, रे यांचे वकील मनु शर्मा यांनी या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI court sentenced 3 yr imprisonment to former Union Minister Dilip Ray in a coal scam case