कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याकडे अन्न आणि शस्त्रास्त्रेही नव्हते, नवाझ शरीफांची पहिल्यांदाच कबुली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

आमचे शूर सैनिक उंचावरच्या शिखरावर अन्न नसेल तर किमान शस्त्रे तरी पाठवा अशी आर्त मागणी करत होते.

इस्लामाबाद- कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. कारगिल युद्धावेळी पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रास्त्रेही नव्हती आणि खाण्यासाठी अन्नही नव्हते, अशी कबुली पहिल्यांदाच नवाझ शरीफ यांनी दिली आहे. कारगिल युद्ध हे पाकिस्तानी लष्कराने नव्हे तर काही सैन्य अधिकाऱ्यांनी सुरु केले होते. या युद्धामुळे जगभरात पाकिस्तानची नाचक्की, झाल्याचे म्हणत त्यांनी तत्कालीन लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्रपती परवेझ मुशरर्फ यांच्यावर निशाणा साधला. 

लंडन येथून पाकिस्तानच्या संयुक्त विरोधी पक्ष पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटच्या तिसऱ्या रॅलीला ते संबोधित करत होते. ते म्हणाले की, या युद्धात सैन्याला कोणतीही रसद आणि सामुग्री न देता उंच शिखरावर पाठवण्यात आले. कारगिलमध्ये आमच्या शेकडो सैनिकांना शहीद करण्यासाठी आणि जगभरात पाकिस्तानची नाचक्की करण्याचा निर्णय लष्कराचा नव्हता. काही मोजक्या जनरल्सनी केवळ आपल्या स्वार्थासाठी सैनिकांना अशा युद्धात ढकलले की ज्याचा काहीच फायदा होणार नव्हता. 

हेही वाचा- बिहारच नव्हे तर संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस, केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण

तो क्षण माझ्यासाठी खूप वेदनादायक होता. जेव्हा मला हे कळले की, आमचे शूर सैनिक उंचावरच्या शिखरावर अन्न नसेल तर किमान शस्त्रे तरी पाठवा अशी आर्त मागणी करत होते...या युद्धामुळे आम्हाला काय मिळाले. कारगिल युद्धामागे अशी व्यक्ती होती, ज्यांनी आपल्या कारनाम्यांवर पडदा टाकण्यासाठी 12 ऑक्टोबर 1990 ला बंडखोरी करत सत्ता प्राप्त केली. ते परवेज मुशरर्फ आणि त्यांचे काही लोक होते, ज्यांनी पाकिस्तानी लष्कराला बदनाम केले.

हेही वाचा- पाकिस्तान-चीनसोबत युद्ध करण्याची तारीख मोदींनी ठरवलीये; भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा

दरम्यान, सध्या पाकिस्तानमध्ये 11 विरोधी पक्षांच्या पीडीएम आघाडीने इम्रान सरकारला नाकीनाऊ आणले आहे. लाखोंच्या संख्येने देशभरात मोर्चे निघत आहेत. रविवारीही बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे तिसरा मोठा मोर्चा काढण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani soldiers did not even have weapons and food during Kargil war says Nawaz Sharif