पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानावर सीबीआयचा छापा

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्या चेन्नईसह राजनाधी दिल्लीतील निवासस्थानी आज (मंगळवार) केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले आहेत.

चेन्नई : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्या चेन्नईसह राजनाधी दिल्लीतील निवासस्थानी आज (मंगळवार) केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले आहेत.

एअरसेल-मॅक्‍सिस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील चौकशीचा एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिली आहे. तर 2008 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अर्थमंत्री असताना चिदंबरम यांनी पीटर मुखर्जी यांच्या मालकीच्या 'आयएनक्‍स मिडिया'ला दिलेल्या मान्यतेसंदर्भात हे छापे टाकण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. चिदंबरम यांचे मूळ गाव कराईकुडी येथेही छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. एकूण 14 ठिकाणी आज सीबीआयने छापा टाकला आहे.

छाप्यानंतर पी. चिदंबरम यांनी 'मला, माझ्या मुलाला आणि मित्रांना लक्ष्य करण्यासाठी सरकारकडून सीबीआय आणि इतर संस्थांचा वापर करण्यात येत आहे. माझा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे', अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर कॉंग्रेसचे तमिळनाडूतील आमदार के. आर. रामास्वामी यांनी चिदंबरम यांच्या निवासस्थानी धाव घेतली. ते म्हणाले, 'या छाप्यांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षचे सरकार आहे. चिदंबरम यांच्याविरुद्ध काहीही सापडलेले नाही. सीबीआय मोदींसाठी काम करत असल्याचे आपल्याला माहिती असून या सर्व प्रकारामागे भाजपचाच हात आहे.' सीबीआय केवळ मोदींच्या निर्देशानुसार चालते असा आरोपही रामास्वामी यांनी यावेळी केला.

महिनाभरापूर्वीच ईडीची नोटीस
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महिनाभरापूर्वीच पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना 45 कोटी रुपयांशी संबंधित परकी चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) उल्लंघनप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चेन्नईस्थित वासन हेल्थ केअर प्रा. लि. कंपनीच्या शेअरविक्रीमध्ये विविध ठिकाणी त्रुटी आढळून आल्या असून, त्या एँडव्हान्टेज स्ट्रॅटाजिक कन्सल्टिंग या कंपनीने केल्या आहेत. या प्रकरणात 45 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून कार्ती हेच त्याचे मुख्य लाभार्थी आहेत, असे ईडीने नोटीशीत म्हटले होते. याशिवाय परदेशी गुंतवणुकीसंदर्भात प्राप्त झालेल्या 2 हजार 262 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी वासन कंपनीचे प्रवर्तक संचालक अरुण, त्यांच्या पत्नी, सासरे द्वारकानाथन यांनाही यापूर्वी नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: CBI raid homes of ex-finance minister P Chidambaram, son Karti