CBI request to UK and interpol to arrests Nirav Modi
CBI request to UK and interpol to arrests Nirav Modi

नीरव मोदीला अटक करा सीबीआयची ब्रिटन आणि इंटरपोलला विनंती 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फरार असलेला हिरेव्यापारी आणि पंजाब नॅशनल बॅंकेत दोन अब्ज डॉलरच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी नीरव मोदी हा लंडनमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई करण्याच्या हालचालींना वेग देण्यात आला असून, त्यासाठी इंटरपोल आणि ब्रिटन सरकारशी संपर्क साधण्यात आला असल्याची माहिती आज सूत्रांनी दिली. फरार असलेल्या नीरवच्या विरोधात यापूर्वीच इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केलेली आहे. त्याला तातडीने अटक करण्याची विनंती सीबीआयने केली आहे. 

ओळख उघड न करण्याच्या अटीवर सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नीरव हा आपली ओळख लपवून ब्रिटनमधून इतर देशांत जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे त्याला ब्रिटनमधून बाहेर जाऊ न देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती इंटरपोलकडे करण्यात आली आहे. 

नीरव हा तेथेच असल्याची माहिती ऑगस्ट 2018 मध्ये ब्रिटन आणि इंटरपोलकडून देण्यात आली होती. मात्र, त्याचा ब्रिटनमधील नेमका ठिकाणा माहीत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. नीरव हा नियमितपणे युरोपातील काही देशांचा प्रवास करत असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. भारत, ब्रिटन आणि अमेरिकेत आपल्या विरोधात सुरू असलेल्या खटल्यांच्या संदर्भात तो वकिलांच्या गाठीभेटी घेत आहे. त्याने मागील वर्षी फ्रान्स, हॉंगकॉंग, अमेरिका आणि बेल्जिअमला भेट दिली होती, असे समजते. 

नीरवला तातडीने अटक करण्याची विनंती सीबीआयने केली आहे. त्याला अटक झाल्यास सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) संयुक्त विशेष पथक लंडनला पाठविण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले. नीरवचा अलिबाग येथील अलिशान बंगला शुक्रवारी (ता. 8) जमीनदोस्त करण्यात आला. नीरव हा लंडनमध्ये फिरत असल्याचे आढळून आले असून, तेथील सेंटर पॉइंट टॉवरच्या पाच खोल्यांच्या अलिशान फ्लॅटमध्ये तो राहत आहे. या फ्लॅटचे महिन्याचे भाडे 17 हजार पौंड (15.5 लाख रुपये) इतके आहे. एवढेच नव्हे, तर तो पुन्हा एकदा हिऱ्यांचा नवा व्यापार करत असल्याचे वृत्त ब्रिटनमधील माध्यमांनी दिले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com