भारतीय लष्कराने वाढवलं निवृत्तीचं वय; वेळेआधीच निवृत्त झाल्यास पूर्ण पेन्शन नाही

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

भारताच्या तीनही सेनेतील अधिकाऱ्यांसंदर्भात काही महत्वाच्या प्रस्तावावर केंद्र सरकार सध्या विचार करत आहे.

नवी दिल्ली - भारताच्या तीनही सेनेतील अधिकाऱ्यांसंदर्भात काही महत्वाच्या प्रस्तावावर केंद्र सरकार सध्या विचार करत आहे. याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार लष्करात कार्यरत असलेले जे अधिकारी वेळेआधीच निवृत्ती घेतात त्यांचे निवृत्तीवेतन कमी केले जाईल आणि निवृत्तीचे वयही वाढवण्याची तयारी सुरु असल्याचं समजतं. 

इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या एचआरशी संबंधित प्रकरणं पाहणाऱ्या आणि को ऑर्डिनेशनसाठी तयार करण्यात आलेल्या डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेअर्सकडून 29 ऑक्टोबरला पत्र जारी करण्यात आलं होतं. यामध्ये म्हटलं होतं की, निवृत्तीवेतन आणि निवृत्ती संदर्भातील नियमांमध्ये बदल करण्याच्या प्रस्तावाचा ड्राफ्ट 10 नोव्हेंबरपर्यंत तयार करून डीएमएचे सचिव जनरल बिपिन रावत यांच्याकडे पाठवण्यात यावा. 

हे वाचा - Bihar Election : 'EVM म्हणजे 'मोदी व्होटींग मशीन'; राहुल गांधींची घणाघाती टीका

आर्मीमध्ये कर्नल, ब्रिगेडियर आणि मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवून ते 57, 58 आणि 59 वर्षे करण्यात यावं असंही म्हटलं आहे. आर्मीशिवाय भारतीय नौदल आणि हवाई दलामध्येही हा नियम लागू होईल. सध्या कर्नल, ब्रिगेडियर आणि मेजर जनरल रँकच्या अधिकाऱ्यांसाठी निवृत्तीचे वय 54 वर्षे, 56 वर्षे आणि 58 वर्षे इतकं आहे.

निवृत्ती वेतनाबाबतीत म्हटलं आहे की, अधिकाऱ्यांनी सेनेत किती वर्षे सेवा झाली आहे या आधारावर निवृत्ती वेतन ठरवण्यात येईल. 20 ते 25 वर्षे सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना 50 टक्के निवृत्ती वेतन तर 26 ते 30 वर्षे सेवा झालेल्यांना 60 टक्के आणि 30 ते 35 वर्षे सेवा झालेल्यांना 75 टक्के निवृत्ती वेतन दिलं जाईल. तसंच ज्यांची सेवा 35 वर्षांहून अधिक काळ झाली आहे त्यांनाच पूर्ण निवृत्ती वेतन देण्यात येईल असं म्हटलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cds-proposes-reforms-retirement-age-to-be-increased