शेतकऱ्यांना सवलत द्या - अखिलेश यादव

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशसह देशभरात शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

लखनौ - देशभरात 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सवलत द्यावी, अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांजवळील नोटा 30 डिसेंबरपर्यंत बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये बदलून मिळणार आहेत. या निर्णयामुळे देशभरात बँकांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच मुद्द्यावरून अखिलेश यादव यांनी केंद्राकडे ही मागणी केली आहे.

अखिलेश यादव म्हणाले, की नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशसह देशभरात शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. रब्बी हंगामात बी आणि खतांसाठी पैशांचा तुटवडा निर्माण झाला आहे. खरीपाचे पीक विकून शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी केली होती. आता या नोटांचा काही उपयोग होत नाही. शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी त्यांनी साठविलेले पैसेही वापरात आणणे अवघड झाले आहे. त्यामुळे केंद्राने त्यांना दिलासा दिला पाहिजे. 

Web Title: central government help daughters wedding and farmers for cash, says Akhilesh Yadav