सिनेमागृहांना केंद्राचा हिरवा कंदील, राज्य सरकार परवानगी देणार का?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 6 October 2020

 केंद्र सरकारच्या आदेशानुसार सिनेमा, थिएटर्स, मल्टिप्लेक्स 15 ऑक्टोंबरपासून उघडता येतील. यासाठी काही अटी आणि नियम सरकारने सांगितले आहेत. 

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील लॉकडाऊनचे नियम शिथिल करून हळू हलू सर्व व्यवहार सुरळीत करण्यासाठी हालचाली केल्या जात आहे. यातच आता 15 ऑक्टोंबरपासून देशात सिनेमागृहे सुरु कऱण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली. 

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्र सरकारच्या आदेशानुसार सिनेमा, थिएटर्स, मल्टिप्लेक्स 15 ऑक्टोंबरपासून उघडता येतील. यासाठी काही अटी आणि नियम सरकारने  सांगितले आहेत. यामध्ये हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्के इतक्याच लोकांना प्रवेश दिला जावा अशी महत्वाची अट असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम आणि प्रोटोकॉलचे पालन करून मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स सुरु करावी असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं. तसंच थिएटर, सिनेमागृहांमध्ये दोन प्रेक्षकांच्या मधली एक सीट रिकामी ठेवण्यात यावी असेही आदेश देण्यात आले आहेत. 

हे वाचा - हाथरसप्रकरणी उत्तराखंड काँग्रेसचा सत्याग्रह; देशभरात योगी सरकारविरोधात निषेध आणि आंदोलनं

केंद्र सरकारने जरी परवानगी दिली असली तरी राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यसरकार जोखीम पत्करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यात हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सिनेमागृहांनाही परवानगी दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे.

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा काही प्रमाणात कमी होत असला तरी काही राज्यात बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. देशात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि दिल्लीत कोरोना आटोक्यात येताना दिसत नाही. ज्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे तिथे टेस्टची संख्याही कमी झाल्याचे दिसले आहे. 

हे वाचा - सरासरीपेक्षा जास्त कोरोनारुग्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात

मागील 24 तासांत देशात कोरोनामुळे 884 रुग्णांचा मृत्यू झाला असून 61 हजार 267 नवे रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंतची कोरोनाबाधितांची संख्या 66 लाख 85 हजार 83 वर गेली आहे. तर सध्या 9 लाख 19 हजार 23 कोरोना रुग्ण उपचार घेत असून 1 लाख 3 हजार 569 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Government permission to cinemas reopening from 15th October