केंद्र सरकार लशीसंदर्भात सर्वपक्षीय चर्चा करणार; मोदींचाही सहभाग

Narendra-Modi
Narendra-Modi

नवी दिल्ली - कोरोना साथीवर विकसित केली जाणारी लस, या लशीचे वितरण या व करोनाशी निगडित अन्य मुद्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारतर्फे ४ डिसेंबर (शुक्रवारी) रोजी सर्वपक्षीय संसदीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक आभासी राहणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संसदेचे हिवाळी अधिवेशन न घेता थेट जानेवारीच्या अखेरीस अर्थसंकल्पी अधिवेशन घेण्याचे सरकारने जवळपास निश्‍चित केल्याचे मानले जात आहे. कोरोनाची वाढती साथ व विशेषतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कडक हिवाळ्यामुळे या साथीची लागण अधिक होण्याच्या अंदाजाच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेतली जात आहे. यामध्ये संसदेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाकडे याबाबतच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधक लस देशात विविध प्रयोगशाळांकडून विकसित केली जात आहे. त्यासंदर्भात पंतप्रधानांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या तर सुमारे तीन प्रयोगशाळांबरोबर त्यांनी संगणकीय संवादाद्वारे माहिती घेतली. पुढील वर्षाच्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात लस उपलब्ध होण्याचे दावे केले जात आहेत. त्या दाव्यांच्या आधारे पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संगणकीय संवाद साधून या लशीच्या वितरणाची आणि लसीकरणाच्या कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्याची सूचना केली होती. लसीकरणासाठी प्राधान्य-गट तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. यामध्ये कुणाला अग्रक्रमाने लसीकरणाची आवश्‍यकता आहे, हे शोधण्याची मोहीम राज्य सरकारांनी हाती घेऊन आतापासूनच तयारी करून ठेवावी असे सांगण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवरच बैठकीत प्रामुख्याने कोरोनाशी निगडित मुद्यांवरच चर्चा होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारतर्फे केल्या जाणाऱ्या तयारीची माहिती पंतप्रधान सर्वपक्षीय नेत्यांना देतील असे समजते. तसेच या नेत्यांच्या सूचना असतील त्याही विचारात घेतल्या जातील, असे सरकारी वर्तुळातून सांगण्यात आले.

तीन पथकांशी मोदींचा संवाद
कोरोनावरील लशीच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या तीन पथकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हर्च्युअल संवाद साधला. लशींबाबत सर्वसामान्यांना परवडेल अशा भाषेमध्ये माहिती देण्यासाठी अधिक मेहनत घ्या, अशी सूचना मोदी यांनी या संशोधकांना केली. लशीच्या नियमन प्रक्रियेबाबत देखील मोदींनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सूचना मागविल्या आहेत असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मंजुरीसाठी ‘मॉडर्ना’चा अर्ज
वॉशिंग्टन :
कोरोनावरील लसनिर्मितीत आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी मॉडर्ना या कंपनीने अमेरिका आणि युरोपमध्ये लशीच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे. ‘मॉडर्ना’ने चाचणीच्या अंतिम टप्प्याचा अहवाल प्रसिद्ध केला असून लस ९४.१ टक्के प्रभावी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. या लशीमुळे कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळले नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com