esakal | Coronavirus : कोरोनाविरुद्धच्या लढाईत 'या' तीन राज्याची परिस्थिती सर्वात वाईट
sakal

बोलून बातमी शोधा

Centre flags gaps in critical care infra shortages worst in UP Bihar Assam

कोरोनाविरुद्धच्या लढाईत उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाम या तीन राज्यांमध्ये आयसोलेशन बेड, व्हेंटीलेटर्स आणि आयसीयू कक्षांची कमतरता असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. या तीन राज्यात देशात सर्वात जास्त वाईट परिस्थिती आहे.

Coronavirus : कोरोनाविरुद्धच्या लढाईत 'या' तीन राज्याची परिस्थिती सर्वात वाईट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढाईत उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाम या तीन राज्यांमध्ये आयसोलेशन बेड, व्हेंटीलेटर्स आणि आयसीयू कक्षांची कमतरता असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे. या तीन राज्यात देशात सर्वात जास्त वाईट परिस्थिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल (ता. २६) रविवारी देशातील राज्यांमधील आरोग्य सेवेचा आढावा घेतला. वेगवेगळ्या राज्यांमध्ये किती आयसोलेशन कक्ष आणि बेड आहेत, व्हेंटीलेटर्स, अती दक्षता विभाग यासंदर्भातील माहिती केंद्र सरकारने घेतली. २३ एप्रिलपर्यंत या राज्यांमध्ये उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीच्या आधारावर ही पहाणी करण्यात आली. केंद्रीय सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये आरोग्य सचिवांनी सहभाग घेतला होता. या बैठकीमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशातील १८३ जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन बेड्सची संख्या १०० हून कमी आहे. त्यापैकी ६७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अढळून आले आहेत.

उत्तरप्रदेश, बिहारमधील परिस्थिती गंभीर
उत्तर प्रदेशमधील ७५ पैकी ५३ जिल्ह्यांमध्ये १०० हून कमी आयसोलेशन बेड आहेत. आयसोलेशन बेड्सची संख्या कमी असणाऱ्या उत्तर प्रदेशमधील या ५३ पैकी ३१ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा रुग्ण अढळून आले आहेत. तर, बिहारमधील ३८ पैकी २० जिल्ह्यांमध्ये १०० पेक्षा कमी आयसोलेशन बेड आहेत. ज्या २० जिल्ह्यांमध्ये आय़सोलेशन बेड कमी आहेत त्यापैकी नऊ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अढळून आले आहेत. आसाममधील ३३ पैकी १९ जिल्ह्यांमध्ये १०० हून कमी आयोसोलेशन बेड आहेत. आयसोलेशन बेडची कमतरता असणाऱ्या १९ पैकी सहा जिल्ह्यांमध्ये करोनाचा रुग्ण अढळून आले आहेत.

देशातील १२३ जिल्ह्यांमध्ये व्हेंटीलेटर्स बेडच नाहीत
देशातील १२३ जिल्ह्यांमध्ये व्हेंटीलेटर्सची सुविधा नसून त्यापैकी ३९ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अढळून आले आहेत. या १२३ जिल्ह्यांपैकी ३५ जिल्हे उत्तर प्रदेशमध्ये, २८ बिहारमध्ये आणि १७ आसाममध्ये आहेत. या व्हेंटीलेटर्सची सुविधा नसणाऱ्या जिल्ह्यांपैकी उत्तर प्रदेशमधील २०, बिहारमधील १० तर आसाममधील ३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण अढळून आले आहेत.