देशात 12 राज्यातील कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचे थैमान; आळा घालण्याचे प्रयत्न सुरु

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

केंद्र सरकारने शनिवारी बर्ड फ्लूच्या सध्यस्थितीबाबत माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : सध्या देशात बर्ड फ्लूचा हाहाकार माजलेला दिसून येत आहे. केंद्र सरकारने शनिवारी बर्ड फ्लूच्या सध्यस्थितीबाबत माहिती दिली आहे. या दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील 9 राज्यांमधील पोल्ट्री बर्ड्समध्ये बर्ड फ्लू आढळला आहे. तर देशातील 12 राज्यांमधील कावळ्यांमध्ये, स्थलांतर अथवा जंगली पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला आहे. 
व्यवसायासाठी पाळलेल्या कोंबडीसारख्या पोल्ट्री बर्ड्सना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. 24 जानेवारीपर्यंत Avian Influenza (Bird flu) ने बाधित पोल्ट्री बर्ड्स 9 राज्यांमध्ये आढळले आहेत. यामध्ये केरळ, हरयाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, उत्तराखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब ही राज्ये आहेत. तर कावळा आणि इतर स्थलांतर करणाऱ्या पक्षांना देशातील 12 राज्यांमध्ये बाधा झाली आहे. यामध्ये मध्य प्रदेश, हरयाणा, महाराष्ट्र, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब या राज्यांचा समावेश होतो. याबाबतची माहिती मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने दिली आहे. 

हेही वाचा - Corona Vaccine Update : भारतात 16 लाखाहून अधिक लसीकरण; जगभरात काय अवस्था?

एव्हीएन इन्फ्लूएंझाच्या विषाणूची लागण महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सावरगाव आणि उजना धारव्हा गावांतील पोल्ट्री पक्ष्यांमध्ये आढळली आहे तर दिल्लीच्या जामिया हमदर्द युनिव्हर्सिटीतील कावळ्यांना देखील लागण झाल्याचे खात्री आहे. केरळमधील एका, मध्य प्रदेशातील तीन आणि महाराष्ट्रातील पाच ठिकाणी बर्ड फ्लूच्या उद्रेकाचे मोठे केंद्र आढळून आले आहेत. याठिकाणी Post Operation Surveillance Plan (POSP) लागू करण्यात आला आहे. 

तर उर्वरित ठिकाणी सध्या या रोगाला आळा घालण्यासाठी म्हणून स्वच्छता आणि निर्जंतुकीकरणाची मोहिम सुरु आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये ही मोहिम सुरु आहे. रोगाला आळा घालण्यासाठी ठरवलेल्या कृती कार्यक्रमानुसार ज्या पोल्ट्री फार्मर्सच्या पक्षी आणि अंड्यांचे नुकसान झाले आहे, अशांना भरपाई देण्यात येत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Centre says Bird flu confirmed in 12 Indian states for crow migratory and wild birds