Corona Vaccine Update : भारतात 16 लाखाहून अधिक लसीकरण; जगभरात काय अवस्था?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

कोणत्या देशात किती लसीकरण पार पडलं आहे, या विषयीच आपण माहिती घेणार आहोत...

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितलं की देशात फक्त सहा दिवसांच्या आतच 10 लाख लोकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. भारत देशाच्या आधीच लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात झालेल्या अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनाही भारताने मागे टाकलं आहे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास 16 लाख लोकांना लस दिली गेली आहे. मात्र, जगभरात लसीकरणाची नेमकी काय अवस्था आहे. कोणत्या देशात किती लसीकरण पार पडलं आहे, या विषयीच आपण माहिती घेणार आहोत...

अमेरिकेत 2 कोटींहून अधिक लोकांना लस
अमेरिका हा कोरोना व्हायरसमुळे जगात सर्वाधिक हैराण आणि त्रस्त झालेला देश आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांना लस दिली गेली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देखील कोरोनाची लस दिली गेली आहे. मात्र, तेंव्हा बायडन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली नव्हती. 

चीनमध्ये 1.5 कोटी लोकांना लस
कोरोनाच्या उत्पत्तीस आणि प्रसारास कारणीभूत देश म्हणून चीनला ओळखलं जातं. सध्या चीनमध्ये लसीकरणाची मोहिम वेगाने सुरु आहे. आकडेवारीनुार, इथे जवळपास 1.5 कोटी लोकांना लस दिली गेली आहे. 

हेही वाचा - काँग्रेस घुसखोरांसाठी दरवाजे उघडेल : शहा

ब्रिटनमध्ये 63 लाख लोकांना लस
ब्रिटन हा लसीच्या आपत्कालीन वापरास मंजूरी देणारा पहिला देश आहे. मात्र, इतर देशांच्या तुलनेत ब्रिटनमधील लसीकरणाची मोहिम अत्यंत मंद गतीने आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 63 लाख लोकांना लस दिली गेली आहे. 

इस्त्रायलमध्येही 24 लाख लोकांना लस
भारताचा मित्र देश इस्त्रायलमध्ये कोरोना लसीकरणास सुरवात करण्यात आली आहे. इस्त्रायलमध्ये आतापर्यंत 24 लाख लोकांना लस दिली गेली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील लस घेतली आहे. त्यांना लस देऊनच देशातील लसीकरणाच्या मोहिमेस सुरवात करण्यात आली होती.

जर्मनी देखील भारताच्या पुढे
कोरोना लस देण्याच्या बाबतीत जर्मनी देखील भारताच्या पुढे आहे. तिथे आतापर्यंत 16.3 लाख हून अधिक लोकांनी लस दिली गेली आहे. मात्र, भारतातील लसीकरणाचा वेग लक्षात घेतला तर लवकरच भारत जर्मनीलाही याबाबत मागे टाकेल, असं दिसून येतंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know all about Corona Vaccine Update in world