पेटलेल्या काश्‍मीरवर चर्चा हाच उपाय: मेहबुबा

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

काश्‍मीरमधील परिस्थिती प्रथम नियंत्रणात आणणे आवश्‍यक आहे. दगडफेक व गोळीबार यांमध्ये शांतता चर्चा होऊ शकत नाही. आपण आपल्याच नागरिकांविरोधात फार काळ संघर्ष करु शकत नाही

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यामधील तणावग्रस्त वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर या राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांना राज्यामधील गंभीर परिस्थितीची माहिती देत मेहबुबा यांनी केंद्र सरकारने जम्मु काश्‍मीरच्या भल्याचा अत्यंत गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन केले.

"जम्मु काश्‍मीरमधील समस्या सोडविण्यासंदर्भात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राबविलेल्या धोरणाचाच अवलंब केला जाईल, असे आश्‍वासन मोदीजी यांनी दिले. हे धोरण अर्थातच संघर्ष टाळणारे व संवादास उत्तेजन देणारे आहे. काश्‍मीरमधील परिस्थिती प्रथम नियंत्रणात आणणे आवश्‍यक आहे. दगडफेक व गोळीबार यांमध्ये शांतता चर्चा होऊ शकत नाही. आपण आपल्याच नागरिकांविरोधात फार काळ संघर्ष करु शकत नाही,'' असे मेहबुबा म्हणाल्या.

राज्य सरकार हे काश्‍मीर खोऱ्यामधील दगडफेकीचे प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही मेहबुबा यांनी यावेळी स्पष्ट केले. मेहबुबा यांचे दिवंगत पिता मुफ्ती मोहम्मद सईद यांनी काश्‍मीरमधील दीर्घकालीन शांततेसाठी योजना मांडली असल्याचेही मेहबुबा यांनी यावेळी सांगितले.

जम्मु काश्‍मीरमध्ये मेहबुबा यांचा पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) व भारतीय जनता पक्ष (भाजप), या पक्षांचे संयुक्त सरकार आहे. मात्र राज्यामधील दगडफेकीचे आंदोलन हाताळण्यासंदर्भात दोन्ही पक्षांमधील मतभेद उघड झाले असून या पार्श्‍वभूमीवर मेहबुबा यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट अत्यंत संवेदनशील मानली जात आहे.

Web Title: Centre should seriously think about welfare of J&K, says Mehbooba