ISRO : चांद्रयान इंजिनची यशस्वी चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrayaan engine successfully tested ISRO Chandrayaan-3 mission in June

ISRO : चांद्रयान इंजिनची यशस्वी चाचणी

बंगळूर : चांद्रयान-३ मोहिमेसाठी प्रक्षेपक म्हणून वापरल्या जाणाऱ्या सीई-२० क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली. भारतीय अंतराळ संशोधन केंद्राने (इस्त्रो) या चाचणीची माहिती दिली. २४ फेब्रवारीला तमिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील ‘इस्त्रो’च्या प्रक्षेपण तळावर नियोजित २५ सेकंदांसाठी हे इंजिन प्रज्ज्वलित करण्यात आले होते.

‘इस्त्रो’ने दिलेल्या माहितीनुसार, चाचणीदरम्यान इंजिनची सर्व कार्यप्रणाली ठरल्याप्रमाणे कार्यान्वित झाली आणि त्याचे अपेक्षित परिणाम पहावयास मिळाले. त्यामुळे आता एकीकृत क्रायोजेनिक इंजिनला इंधनाची टाकी जोडल्यानंतर ते उड्डाणासाठी सज्ज होईल.

तत्पूर्वी, या वर्षाच्या सुरवातीला चांद्रयान-२ लँडरची तिरुपती येथील यू.आर.राव उपग्रह केंद्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी उपग्रह निर्मितीच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नात मैलाचा दगड आहे, असे ‘इस्रो’ने म्हटले आहे.

चांद्रयान -३ ही भारताची तिसरी चांद्र मोहिम आहे. यात तीन प्रमुख मॉड्यूल असून त्यात वेग देणारे मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि रोव्हर याचा समावेश आहे. अभियानातील गुंतागुंत पाहता तिन्ही मॉड्यूलमध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी स्थापन करणे महत्त्वाचे आहे. चांद्रयान मोहीम-३ चा उद्देश हा चंद्रावर सुरक्षितरित्या उतरणे आणि रोव्हरच्या मदतीने नमुने गोळा करण्याची क्षमता सिद्ध करणे, हा आहे.

‘इस्त्रो’कडून यंदाच्या जून महिन्यांत प्रक्षेपण करण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. चांद्रयान-३ ला आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून मार्क-३ च्या मदतीने चंद्राच्या दिशेने सोडले जाईल. प्रक्षेपकाद्वारे लँडर आणि रोव्हरला चंद्रापासून शंभर किलोमीटरच्या कक्षेत सोडले जाईल.

टॅग्स :IsroDesh news