जीवनात बदलासाठी विकास आवश्‍यक : मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

"नितीन गडकरी असे मंत्री आहेत, की ते वेळेवर काम करण्यात कुशल आहेत. ज्या तारखेला लोकार्पण निश्‍चित होईल, तोपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, असा मला विश्‍वास आहे.''
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

साहिबगंज (झारखंड): येत्या 2022 पर्यंत नवीन भारताची निर्मिती करायची आहे. गरीब, आदिवासी आणि मागास भागातील नागरिकांच्या जीवनात बदल करायचा असेल तर त्यावर एकच उपाय म्हणजे विकास होय, असे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित सभेत केले. हाच विकास जीवनात बदल घडवून आणेल, असा विश्‍वासही मोदी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 2266 कोटींच्या गंगा नदीवरील प्रस्तावित पुलाचे आज साहिबगंज येथे भूमिपूजन केले. त्या वेळी ते बोलत होते.

झारखंड राज्य जागतिक बाजाराशी जोडले जाणार आहे. झारखंडमध्ये विकासाच्या नवीन वाटा निर्माण होत आहेत. नदी मार्गात क्रांती घडत असून, झारखंडमध्ये दुधाबरोबर मध निर्मितीचे काम वाढायला हवे, अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. गंगा नदीवर उभारण्यात येणारा पूल झारखंडला पूर्व भारताशी जोडेल. गंगा नदीवरील हा पूल केवळ दोन राज्यांना नाही, तर झारखंडच्या विकासाचे द्वारे उघडणारा ठरणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी राज्यातील एक लाख महिलांना स्मार्ट फोन वितरण करण्याच्या उपक्रमाचे उद्‌घाटन केले. याशिवाय पंतप्रधानांनी विविध उपक्रमाचा शुभारंभ केला. त्यांनी गंगा नदीच्या किनाऱ्यावर मल्टी मोड टर्मिनलचेदेखील भूमिपूजन केले. येथून नदीच्या मार्गाने नौका आणि रस्ते परिवहनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. या बंदरामुळे झारखंड संपूर्ण जगाशी जोडले जाईल, असे मोदी म्हणाले.

काय म्हणाले

  • सौर ऊर्जेत भारताचे काम क्रांतिकारी
  • गंगा नदीच्या माध्यमातून झारखंड जगाला जोडणार
  • गुजरातकडून दुग्धव्यवसायाचा आदर्श घ्यावा
  • शेतकऱ्याने दुधाबरोबरच मधापासूनही उत्पन्न घ्यावे
Web Title: Change needed for the development of life: Modi