चारधाम यात्रेसाठी लवकरच रेल्वेसेवा

चारधाम यात्रेसाठी लवकरच रेल्वेसेवा

"रेल विकास निगम' करणार अंतिम स्थळ सर्वेक्षण

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील चारधाम तीर्थक्षेत्रे लवकरच रेल्वेच्या माध्यमातून परस्परांशी जोडली जाणार असून, रेल्वे खात्याकडून या आठवड्यामध्ये या स्थळांचे अंतिम सर्वेक्षण केले जाणार आहे. या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च चाळीस हजार कोटी रुपये एवढा असून, "रेल विकास निगम'कडे याच्या सर्वेक्षणाचे काम सोपविण्यात आले आहे.

गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ हे चार धाम डेहराडून आणि करणप्रयागमार्गे जोडले जाणार आहेत. "रेल निगम'ने यासाठी 2014-15 मध्ये अभियांत्रिकी सर्वेक्षण करत त्याचा अहवाल ऑक्‍टोबर 2015 मध्येच सादर केला होता. या संपूर्ण प्रकल्पामध्ये लोहमार्गाची लांबी ही 327 किलोमीटर एवढी राहणार असून, त्यावर 43 हजार 292 कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

रेल्वेच्या महाकाय प्रकल्पाची व्याप्ती
या संपूर्ण लोहमार्गावर 21 नवी स्थानके, 279 किलोमीटरची लांबी असलेले 61 बोगदे आणि 59 पुलांचा समावेश असेल. हिमालयाच्या पर्वतरांगांमधून हा लोहमार्ग उभारावा लागणार असल्याने रेल्वे खात्यासमोर सर्वांत मोठे आव्हान हे प्रतिकूल निसर्गाचेच आहे. सध्या चारधाम यात्रेला जाणाऱ्यांसाठी डोईवाला, ऋषीकेश आणि करणप्रयाग ही रेल्वेस्थानके अधिक जवळची ठरतात.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते 13 मे रोजी बद्रीनाथ येथे "सिंगल ब्रॉडगेज लाइन'च्या उभारणीसाठीच्या अंतिम स्थळ सर्वेक्षणाला प्रारंभ होईल. यमुनेचे जन्मस्थान असलेल्या यमुनोत्री या धामाची समुद्रसपाटीपासूनची उंची 3 हजार 293 मीटर एवढी असून, गंगेचे उगमस्थान असणाऱ्या गंगोत्रीची उंची ही 3 हजार 408 मीटर एवढी आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे शिवतीर्थ क्षेत्र केदारनाथची समुद्रसपाटीपासूनची उंची 3 हजार 583 मीटर एवढी असून विष्णुतीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे बद्रीनाथ धाम हे 3 हजार 133 मीटर उंचीवर वसलेले आहे. यात्रेकरूंव्यतिरिक्त परकीय पर्यटकदेखील या स्थळांना मोठ्या संख्येने भेटी देतात. नव्या रेल्वे प्रकल्पामुळे चारधाम यात्रा सुखकर होईल.

रेल्वेमंत्रालय ऋषीकेश आणि करणप्रयाग दरम्यानच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पावर काम करत आहे, सध्या या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या दोन्ही रेल्वे प्रकल्पांमुळे उत्तराखंडच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे, असे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

"तेजस'चे नवे डबे दोन दिवसांत
कापुरथळा, : रेल्वे प्रवाशांचा दिल्ली- चंडीगड दरम्यानचा प्रवास अधिक सुखकर होणार असून, अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या "तेजस' एक्‍स्प्रेस या वेगवान गाडीसाठी तयार करण्यात आलेले 19 डबे पुढील दोन दिवसांमध्ये रेल्वे खात्याच्या ताब्यात येतील. येथील "रेल कोच फॅक्‍टरी'मध्ये या डब्यांची निर्मिती केली जात आहे. "तेजस' एक्‍स्प्रेस दोनशे किलोमीटर प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने धावू शकेल. पहिल्या टप्प्यात दिल्या जाणाऱ्या 19 डब्यांमध्ये सोळा हे नॉन-एक्‍झिक्‍युटिव्ह आणि दोन हे एक्‍झिक्‍युटिव्ह असतील. उर्वरित एक पॉवर कोच असेल तो पंधरा मेपर्यंत रेल्वे खात्याकडे सुपूर्द केला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com