झूम!! चेन्नई - बंगळूर 30 मिनिटांत !

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

ही योजना यशस्वी झाल्यास चेन्नई-बंगळूर अंतर 30 मिनिटांत; तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईस जाण्यासाठी (चेन्नई येथून) सुमारे तासभराचा अवधी लागेल

चेन्नई - तमिळनाडूमधील चेन्नई आणि कर्नाटकमधील बंगळूर या दोन शहरांमधील 345 किमींचे अंतर अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण करणाऱ्या एका बुलेट ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव अमेरिकेमधील हायपरलूप वन या कंपनीने मांडला आहे!

एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये प्रवास करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पारंपारिक दळणवळण व्यवस्थांमध्ये क्रांती घडवून आणण्याची या कंपनीचे ध्येय आहे. भारताच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनामधून ही दोन्ही शहरे अर्थातच अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या पार्श्‍वभूमीवर कंपनीने मांडलेला प्रस्ताव अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

कॉंक्रीटच्या स्तंभांवरुन प्रवास करणाऱ्या या "ट्यूब'चा वेग ताशी 1200 किमी इतका असेल. यासाठी बांधण्यात येणाऱ्या बोगद्यामध्ये तयार करण्यात आलेल्या पोकळीवर (व्हॅक्‍युम) तरंगत ही बुलेट ट्रेन मार्गक्रमण करेल. ही योजना यशस्वी झाल्यास चेन्नई-बंगळूर अंतर 30 मिनिटांत; तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईस जाण्यासाठी (चेन्नई येथून) सुमारे तासभराचा अवधी लागेल. चेन्नई-बंगळूरसह चेन्नई-मुंबई, पुणे-मुंबई, बंगळूर-थिरुअनंतपूरम आणि मुंबई-दिल्ली या शहरांना जोडणाऱ्या बुलेट ट्रेन्स बांधण्यासाठी कंपनी उत्सुक आहे. यासंदर्भातील प्रस्ताव कंपनीकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयासमोर मांडण्यात आला आहे.

भारतामध्ये बुलेट ट्रेन बांधण्याचे कंत्राट मिळविण्यासाठी विविध देशांमधील कंपन्या उत्सुक आहेत. या पार्श्‍वभूमीवर या हायपरलूप वननेही स्पर्धेत उतरल्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावानुसार बुलेट ट्रेन एक किमी जाण्यासाठी 300 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.

Web Title: Chennai to Bengaluru in 30 minutes