शशिकला, दिनकरन यांची हकालपट्टी

वृत्तसंस्था
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

अण्णा द्रमुक कार्यकारिणी बैठकीत निर्णय; या पुढे पक्षात सरचिटणीसपद नाही

अण्णा द्रमुक कार्यकारिणी बैठकीत निर्णय; या पुढे पक्षात सरचिटणीसपद नाही

चेन्नई : तमिळनाडूच्या मातब्बर राजकीय नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूतील सुरू असलेला राजकीय खेळखंडोबा अजूनही शमण्याची चिन्हे नाहीत. अण्णा द्रमुकच्या कार्यकारिणीने आज काळजीवाहू सरचिटणीस व्ही. के. शशिकला आणि उपसरचिटणीस दिनकरन यांना पदच्युत करून पक्षातून हकालपट्टी केली. पक्षाचे संस्थापक दिवंगत एम. जी. रामचंद्रन आणि दिवंगत जे. जयललिता यांच्याशिवाय अण्णा द्रमुक पक्ष अन्य कोणालाही सरचिटणीस म्हणून स्वीकारणार नाही, असे पक्षाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. पक्षाच्या बैठकीत शशिकला यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पक्षाचे आयटी विंगचे सहसचिव हरी प्रभाकरन यांनी ट्विट करून शशिकला आणि दिनकरन यांना पक्षाच्या सर्वच पदांवरून काढल्याचे म्हटले आहे. याशिवाय बैठकीत नियम आणि तरतुदीत संशोधन करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून भविष्यात पक्षात सरचिटणीसपद राहणार नाही. पक्षासंबंधीचे निर्णय आता संचालक समिती घेणार आहे. ही समिती नेमण्याबाबत 21 ऑगस्टला मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वम यांचे विलीनीकरण झाल्यानंतर बैठक झाली होती. आजची बैठक ही विलीनीकरणानंतरची पहिलीच बैठक होती. ई. मधुसूदन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पलानीस्वामी आणि पनीरसेल्वमसह पक्षाच्या अन्य नेत्यांनी सहभाग घेतला होता.

बैठकीत झालेल्या प्रस्तावाची माहिती तमिळनाडूचे मंत्री आर.बी.उदयकुमार यांनी दिली. ते म्हणाले की, दिवंगत जयललिता यांनी पक्षातील पदाधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती केली होती त्या कायम ठेवण्यात आल्या आहेत. पक्ष आता एकसंघ असून निवडणूक चिन्ह "दोन पानं' हे परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. काळजीवाहू सरचिटणीस पद रद्द करण्यावर एकमत झाले असून शशिकला यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. दिवंगत जयललिता या पक्षाच्या कायमस्वरुपी सरचिटणीस म्हणून राहतील, असे उदयकुमार यांनी नमूद केले. संयुक्त अण्णाद्रमुकने शशिकला यांना पक्षातून काढल्याने 26 डिसेंबर 2016 रोजी घेतलेले निर्णय आता गैरलागू ठरले आहेत. त्यात शशिकला यांनी नातेवाईक टीटीव्ही दिनकरन यांना उप सरचिटणीस म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. याचाच अर्थ असा की, दिनकरन यांचा कोणताही आदेश पक्ष कार्यकर्त्यांना लागू असणार नाही.

हकालपट्टीचा निर्णय
अण्णा द्रमुक पक्षात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्‍वभूमीवर शशिकला यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला, तसेच दिनकरन आणि त्यांचे समर्थक 14 आमदार सातत्याने फ्लोर टेस्टची मागणी करत होते. या संदर्भात त्यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. शशिकला सध्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगात असून दिनकरन हे लाचखोरी प्रकरणी सीबीआय चौकशीचा सामना करत आहेत. पक्षाच्या चिन्हासाठी लाच दिल्याचा दिनकरन यांच्यावर ठपका आहे.

अण्णा द्रमुकच्या निर्णयाने दिनकरन नाराज
पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत घेतलेल्या निर्णयाने दिनकरन यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले, की पक्षाने मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहण्याची गरज होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार बैठकीत घेतलेल्या निर्णयासंबंधी दाखल याचिकेवरील निकालानंतरच शशिकला यांना पदावरून काढणे योग्य की अयोग्य आहे, हे ठरणार आहे. दिनकरन म्हणाले, की या मुदद्याला अवास्तव महत्त्व द्यायला नको. याच परिषदेने शशिकला यांची सरचिटणीस म्हणून निवड केली होती, हे लक्षात घ्यायला हवे. दिनकरन यांनी पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांना आव्हान देत पक्ष कार्यकर्त्यांचे समर्थन असेल तर निवडणूक लढवून दाखवावी असे म्हटले आहे. जर निवडणुकीला सामोरे गेलो तर अनेक मंत्र्यांना पराभवाची भिती असल्याचा दावा दिनकरन यांनी केला आहे.

Web Title: chennai news Sasikala, Dinakaran's expulsion