मुख्य आर्थिक सल्लागार म्हणतात, 5 टक्के विकासदर समाधानकारक

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 30 August 2019

गेल्या साडेसहा वर्षातील निच्चांकी पातळीवर जीडीपी येऊनही हा विकासदर समाधानकारक असल्याचे मत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : सन 2019-20 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहितील आर्थिक विकासदरात (जीडीपी) घट झाल्यानंतर देशातील अर्थविश्वास चिंतेचे वातावरण निर्माण झाले. जीडीपी 5 टक्क्यावर आल्यानंतर अर्थविश्वात समाधानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या बचावासाठी मुख्य आर्थिक सल्लागारांना मैदानात उतरावे लागले. 

गेल्या साडेसहा वर्षातील निच्चांकी पातळीवर जीडीपी येऊनही हा विकासदर समाधानकारक असल्याचे मत देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले. घटलेल्या विकासदरामुळे सरकार निराश झाले आहे, असे विचारल्यानंतर त्यांनी आपण ज्या शब्दांचा वापर करत आहात त्यावरून आपण मंदीच्या काळातून जात आहोत असे वाटते. त्यामुळे आपण बोलताना नक्की विचार करायला हवा, असे म्हटले. 

ते पुढे म्हणाले, जागतिक अर्थव्यवस्था खराब असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेत सुस्ती आली आहे. मात्र, 5 टक्के विकासदरासह आपण नक्कीच वाटचाल करू शकतो. अर्थमंत्र्यांनी नुकत्याच केलेल्या घोषणांवरून केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य सरकार नक्कीच गाठेल, अशी टिप्पणी त्यांनी केली.  

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च 2019) जीडीपी 5.8 टक्क्यांवर होता. 0.8 ने आता त्यात घट होऊन तो 5 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी या काळात जीडीपी 8 टक्क्यांवर होता. गेल्या सहा वर्षातील ही निच्चांकी पातळी असल्याने देशाची अर्थव्यवस्था कठीण प्रसंगातून जात आहे, हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief financial adviser says 5 percent growth rate is satisfy