गोव्याचा भावी मुख्यमंत्री ठरता ठरेना...

goa
goa

पणजी : गोवा मंत्रिमंडळातून अॅड फ्रांसिस डिसोझा व पांडुरंग मडकईकर यांना वगळल्यानंतर भाजपसमोर निर्माण झालेला पेच वाढत चालला आहे. पूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी गोव्याच्या राजकारणात लक्ष घालत होते, अाता खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लक्ष घालत असूनही, त्यांनाही हा गुंता सोडवता आलेला नाही. भाजप चौफेर कोंडीत सापडला असून त्यामुळे तूर्त गोव्यात नेतृत्वबदल नको अशी बोटचेपी भूमिका भाजपला घ्यावी लागली आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर दिल्लीतील एम्समध्ये महिनाभर होते. ते तेथे असताना मंत्रिमंडळात बदल करण्यात आला. नीलेश काब्राल आणि मिलिंद नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतर  इतर अनेकांच्या आशा आकांक्षांना पालवी फुटली. उपसभापती मायकल लोबो यांनी जाहीरपणे हा विषय मांडला होता. हळदोण्याचे आमदार ग्लेन टिकलो यांचे समर्थकही एकवटले होते. डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांना मंत्रिपद द्यावी असा सूर डिचोलीत उमटला होता. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदल होईल असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांना द्यावे लागले होते. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यानी याच सरकारमध्ये लोबो यांना स्थान मिळेल असे सांगून राजकीय उत्सुुकता ताणली होती.

मंत्रिमंडळ बदलानंतर सुरु झालेली राजकीय वावटळ थांबण्याची चिन्हे दिसत नसतानाच अचानकपणे मुख्यमंत्री पर्रीकर गोव्यात आले. ते आल्यावर पुन्हा नेतृत्व बदलाची चर्चा जोर धरू लागली. रक्तदाबाच्या दुखण्याने डोके वर काढल्याने त्यांनी स्ट्रेचरवरून दिल्ली ते गोवा प्रवास केला. मात्र त्यांची प्रकृती अतिशय खालावल्याचा अर्थ काढून नेतृत्व बदलासाठी हालचाली आपसूकपणे सुरु करण्यात आल्या. कॉंग्रेसचे सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यासोबत दिल्लीत गेलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा सुरु झाली. विधानसभेचे सभापती डॉ. प्रमोद सावंत हेही तातडीने दिल्लीला गेल्याने त्यांच्या नावाची चर्चाही सुरु झाली. शहा यांनी काल सरदेसाई व ढवळीकर यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. मात्र या चर्चेनंतर गुंता सुटण्याऐवजी वाढल्याचीच माहिती मिळाली आहे. त्यामुळे तूर्त नेतृत्वबदल नाही या निर्णयाप्रत भाजप आल्याचे समजते.

मगोच्या ढवळीकरांची गुगली
मगोचे नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन  ढवळीकर यांनी भाजपचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेतृत्व बदलाची वेळ आल्यास त्यावेळी घटक पक्षांचा विचार केला जावा. त्यातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकांत भाजपविषयी चांगला संदेश जाईल असे सांगत मगो सरकारच्या नेतृत्व करण्यासाठी इच्छूक असल्याचे सुचवले. ढवळीकर यांनी तू्र्त नेतृत्वबदल करू नये, पर्रीकर यांनाच मुख्यमंत्रीपदी कायम ठेवावे. तेच पदत्याग करत असतील तर घटक पक्षांचाही विचार केला जावा असे त्यांनी सुचवले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com