चीन लडाखमधून सर्व सैन्य मागे घेण्यास सहमत- भारत सरकार

कार्तिक पुजारी
शुक्रवार, 24 जुलै 2020

भारत आणि चीनमध्ये लवकरात लवकर आणि संपूर्ण सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून मागे घण्यावर सहमती झाल्याची अधिकृती माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

नवी दिल्ली- भारत आणि चीनमध्ये लवकरात लवकर आणि संपूर्ण सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून मागे घण्यावर सहमती झाल्याची अधिकृती माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये सैन्य मागे घेणे आणि सीमा भागात शांतता प्रस्थापित करण्याबाबत द्विपक्षीय करार झाल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. भारत-चीनदरम्यान लष्करी स्तरावरील १७ वी बैठक शुक्रवारी पार पडली. त्यानंतर मंत्रालयाकडून हे वक्तव्य आलं आहे. 

भारतात टिकटॉक पुन्हा सुरु होणार? हालचाली सुरु
भारताकडून परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी नवीन श्रीवास्तव आणि चीनचे परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी हाँग लीयांग यांनी बैठकीचं नेतृत्व केलं. १५ जून रोजी झालेल्या  रक्तरंजित संघर्षानंतर दोन्ही देशामंध्ये राजनैतिक आणि लष्करी स्तरावर चर्चा सुरु होती. शुक्रवारी दोन्ही देशांमध्ये १७ वी बैठक पार पडली. यावेळी दोन्ही देशांनी पूर्वस्थिती प्रस्थापित करण्याचे मान्य केल्याचं भारताकडून सांगण्यात आलं आहे. तसेच वादाचे ठरलेल्या पैंगोग त्सो, डेसपांग आणि गोगरा या भागातूनही चीन सैन्य मागे घेणार असल्याचं सांगण्यात येतं आहे. 

चीनने मागिल काही बैठकीमध्ये सैन्य मागे घेण्याचं मान्य केलं होतं. शिवाय चीनने काही भागातून सैन्याला मागेही बोलावलं होतं. मात्र पैंगोद त्सो, डेसपांग, गोगरा आणि फिंगर भागातून चिनी सैन्य मागे हटत नव्हते. चीनच्या सैनिकांनी या भागात बांधकामही सुरु केले होते. त्यामुळे परिस्थिती स्फोटक बनली होती. चीनने या भागात मोठ्या प्रमाणात सैनिक जमा केले होते. भारतानेही प्रत्युत्तर म्हणून ४० हजार सैन्य या भागात तैनात केले आहे. मात्र, आता सरकारकडून अधिकृत वक्तव्य आल्याने चीन सैन्य मागे घेण्याची आशा आहे.

गाडीवर मागे बसणाऱ्यासाठी होणार बदल, सरकारचा नवा आदेश
संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी लडाख भेटीमध्ये सूचक वक्तव्य केलं होतं. चीनसोबत लष्करी स्तरावर चर्चा सुरु आहे. पण कितपत प्रश्न सुटतील याबाबत शंका आहे, असं ते म्हणाले होते. त्यामुळे परिस्थिती बिघडत असल्याचं मानलं जात होतं. दोन्ही देशांनी सीमा भागात मोठ्या प्रमाणात हालचाली वाढवल्या होत्या. मात्र, सरकारच्या नव्या माहितीनुसार चीनची पीएलआय मागे हटणार असल्याचं कळत आहे.

दरम्यान, १५ जून रोजी भारत-चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध टोकाला गेले होते. त्यानंतर झालेल्या दोन्ही देशांच्या चर्चांमध्ये दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचे ठरले होते. मात्र, चीनने काही भागातून माघार घेण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे सरकारच्या म्हणण्यानुसार चीन यावेळी सैन्य खरंच मागे घेईल का, हे पाहावं लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China agrees for complete disengagement from LAC said Government