esakal | चीन ठाण मांडणार असेल तर शड्डू ठोकू : लष्करप्रमुख नरवणेंचा ड्रॅगनला इशारा | New Delhi
sakal

बोलून बातमी शोधा

Manoj Naravane

चीन ठाण मांडणार असेल तर शड्डू ठोकू : लष्करप्रमुख नरवणेंचा ड्रॅगनला इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ही लडाखमध्ये ठाण मांडून बसणार असेल तर भारतीय लष्करही तिथे शड्डू ठोकेल.’’ असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’मध्ये बोलताना केले. नरवणे यांच्या बोलण्याचा रोख हा यावेळी चीन सीमावर्ती भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ उभारत असलेल्या पायाभूत सेवा आणि लष्करी ठाण्यांच्या दिशेने होता.

भारत आणि चीन यांच्यातील लष्करी चर्चेची तेरावी फेरी पार पडणार असून त्यापार्श्वभूमीवर नरवणे यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मागील वर्षी दोन्ही देशांत सीमावादावरून संघर्ष निर्माण झाला असताना चीनकडून ज्या पायाभूत सेवांची उभारणी केली जात होती, ती सध्याही सुरू असून ही बाब आमच्यादृष्टीने चिंताजनक असल्याचे लष्करप्रमुख नरवणे यांनी स्पष्ट केले. सध्या या भागात चीनकडून ज्या पायाभूत सेवा आणि केंद्रे उभारली जात आहेत ती पाहता त्यांच्या लष्कराला येथे दीर्घकाळ राहायचे आहे असे दिसते. आम्ही येथील चीनच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहोत. ते जर तिथे थांबणार असतील तर आम्हीपण तिथेच थांबू, असेही नरवणे यांनी स्पष्ट केले.

परकी दहशतवाद्यांचा धोका

सध्या तालिबान्यांच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानातील स्थिती स्थिर झाल्यानंतर तेथील दहशतवादी जम्मू- काश्‍मीरमध्ये घुसखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मतही नरवणे यांनी मांडले. दोन दशकांपूर्वी या देशाची सत्ता तालिबान्यांच्या हातात असताना देखील अशीच स्थिती पाहायला मिळाली होती, असे ते म्हणाले. भारतीय सुरक्षा दलेही कोणत्याही आव्हानांना सामोरे जायला तयार आहेत, कारण त्यांच्याकडे घुसखोरीला रोखणारी प्रभावी यंत्रणा आहे. तसेच जम्मू- काश्‍मीरमधील दहशतवादी कारवायांवर देखील ते बारकाईने लक्ष ठेवू शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले.

ती शक्यता नाकारता येत नाही

मध्यंतरी काश्‍मीर खोऱ्यात काही सर्वसामान्य नागरिकांच्या हत्या झाल्या होत्या त्याचा अफगाणिस्तानातील सत्तांतराशी काही संबंध आहे का? असे विचारले असता नरवणे यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देणे टाळले होते. सध्याच्या जम्मू आणि काश्‍मीरमधील वाढलेल्या दहशतवादी कारवायांचा अफगाणिस्तानात जे काही घडते आहे त्याच्याशी संबंध आहे का हे आपण आताच ठोसपणे सांगू शकत नाही. याआधी मात्र अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता असताना काश्‍मीर खोऱ्यामध्ये परकी मूळ असलेले दहशतवादी आढळून येत होते. अफगाणिस्तानातील स्थिती स्थिर झाल्यानंतर आपल्याकडे देखील असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही नरवणे यांनी नमूद केले.

loading image
go to top