खाद्य पदार्थ विक्रीला मनाई, इंटरव्हलमध्ये गर्दी नको; जाणून घ्या थिएटर्सबाबतची नियमावली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

महाराष्ट्र, राजस्थान आणि ओडिसा या राज्यांत थिएटर सुरु करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाहीये. 

कोरोना प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात सिनेमा थिएटर्स आणि मल्टीप्लेक्स 23 मार्चपासून बंद केले गेले होते. जसजसे लॉकडाऊनची परिस्थिती टप्प्याटप्प्याने उठवली गेली तसतशी अनेक गोष्टींना परवानगी देण्यात आली. अनलॉक 5 चा टप्पा 1 ऑक्टोबरपासून जाहीर केला आहे. या अनलॉक 5 मध्ये केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 15 ऑक्टोबरपासून सिनेमा थिएटर सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सिनेमा थिएटर आणि मल्टीपेक्स सुरु करताना Standard Operating Procedures (SOP) म्हणजेच सिनेमा थिएटरसाठी एक नियमावली जाहीर केली गेली आहे. याअंतर्गत अनेक राज्यांनी 15 ऑक्टोबरपासून आपल्या राज्यात सिनेमा थिएटर सुरु करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारने याबाबत अद्याप सकारात्मकता दाखवली नाहीये. 

जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार, 50 टक्के क्षमतेने थिएटर सुरु राहतील. एका प्रेक्षकाच्या आजूबाजूला आणि मागे-पुढे दुसरा प्रेक्षक बसणार नाही याची खबरदारी घेणे अनिवार्य आहे. तसेच थिएटरमधील कर्मचारी कोरोना निगेटीव्ह असतील, याचीही खात्री करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाला कर्मचाऱ्यांचे कोरोना रिपोर्ट सादर करणे अनिवार्य आहे.  तब्बल सात महिन्यांपासून बंद असलेल्या थिएटर्सना आता परवानगी मिळाली असल्याने थिएटर्स मालकांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. मात्र, खुप कडक नियमावलीसह ही परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय हा त्या-त्या राज्यांच्या सरकारांनीच घ्यायचा आहे. त्यामुळे, अद्यापही महाराष्ट्रासह अनेक राज्यातील थिएटर मालक परवानगीची वाट पाहत आहेत. 

हेही वाचा - 'मोबाईल रेडिएशन कमी करायचंय? गायीच्या शेणाची चीप वापरा'

नियमावली :
- 50 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने थिएटर सुरु करता येणार नाही.
- फिजीकल डिस्टंन्सिगचे पालन अनिवार्य
- रिकाम्या सोडायच्या सीटवर तसा उल्लेख हवा.
- हात धुण्याची सोय आणि सॅनिटायझर हवेत.
- थर्मल स्क्रिनिंगद्वारे लक्षणे नसलेल्यांनाच परवानगी
- ऑनलाईन पद्धतीने व्यवहाराला प्राधान्य द्या
- वरचेवर आणि नियमित तिकीटघराचे निर्जंतुकीकरण आवश्यक
- गर्दी टाळण्यासाठी एकाहून अधिक तिकीटघरांची तजवीज आवश्यक
- मध्यांतरात प्रेक्षकांना गर्दी करता येणार नाही.
- तिकीटघरासमोर अंतराने उभे राहण्यासाठी मार्कींग हवे
- गर्दी टाळण्यासाठी ऍडव्हान्स्ड बुकींगला प्राधान्य
- थिएटरमध्ये थुंकण्यास पूर्णपणे बंदी
- पॅकेज्ड खाद्यपदार्थांनाच परवानगी, सिनेमाघरात विक्रीस परवानगी नाही

हेही वाचा - Corona Update : गेल्या 24 तासात 55,342 नवे रुग्ण; 706 लोकांचा मृत्यू

या राज्यात 15 ऑक्टोबर पासून सिनेमा थिएटर सुरु
दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिर, हरयाणा, पंजाब, गुजरात, मणिपूर, बिहार, गोवा, छत्तीसगड, उत्तराखंड, चंदीगढ, पश्चिम बंगाल, कर्नाटक, पाँडेचेरी या राज्यांत 15 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने थिएटर सुरु करण्यास राज्यशासनाने परवानगी दिली आहे.  

या राज्यात 31 ऑक्टोबरपर्यंत परवानगी नाही
महाराष्ट्र, राजस्थान आणि ओडिसा या राज्यांत थिएटर सुरु करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाहीये. 31 ऑक्टोबरपर्यंत तरी परवानगी नसल्याचा निर्वाळा राज्यशासनाने दिला आहे. त्यानंतर सुरु होईल की नाही याबाबतचा निर्णय कळवण्यात येईल, असं शासनाने स्पष्ट केलं आहे. 

या राज्यात अद्याप निर्णय प्रलंबित
आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम या राज्यांनी केंद्राच्या निर्णयावर अद्याप आपला निर्णय कळवला नाहीये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cinema halls to reopen with SOP no permission in Maharashtra till 31 october