काश्‍मीरमध्ये चित्रपटांवरील पडदा उघडला

तीन दशकांनंतर दोन चित्रपटगृहांचे उद्‌घाटन
Kashmir two Cinema theaters Opening
Kashmir two Cinema theaters Opening

जम्मू : जम्मू काश्‍मीरमधील चित्रपट रसिकांसाठी आजचा रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. तीन दशकांच्या खंडानंतर येथे दोन चित्रपटगृहे सुरु झाली असून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांचे उद्‌घाटन केले. कट्टरतावाद्यांचा विरोध असला तरी या चित्रपटगृहांमुळे जम्मू काश्‍मीरमधील परिस्थिती सर्वसामान्य होत असल्याचे आणि त्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे दिसून आल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली आहे.

जम्मू काश्‍मीरमध्ये 32 वर्षांपूर्वी कट्टर इस्लामवाद्यांनी फतवा काढून चित्रपटगृहे बंद पाडली होती. पडद्यावर दाखविली जाणारी अशी करमणूक धर्मविरोधी असल्याचे त्या फतव्यात म्हटले होते. त्याचा फटका येथील चित्रपट व्यवसायाला होऊन सामान्य नागरिक या मनोरंजनापासून वंचित राहिले. आज नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी पुलवामा आणि शोपियाँ या दोन शहरांमध्ये चित्रपटगृहांचे उद्‌घाटन केल्याने नागरिकांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा चित्रपटांचा आनंद घेता येणार आहे. या चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांशिवाय, विविध प्रकारची मनोरंजक माहिती आणि युवकांसाठी विविध कौशल्यांची माहितीही देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशी चित्रपटगृहे जम्मू काश्‍मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात उभारणार असल्याचे मनोज सिन्हा यांनी सांगितले.

जम्मू काश्‍मीरमध्ये चित्रपटगृह सुरु करण्यासाठी प्रशासनाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चित्रपट धोरण जाहीर केले होते. या धोरणाचा पाठपुरावा करत प्रशासनाने आज दोन चित्रपटगृहे सुरु केली, तर पुढील आठवड्यात श्रीनगरमध्ये 520 आसन क्षमता असलेले आणखी एक चित्रपटगृह सुरु केले जाणार आहे.

पूर्वीचे प्रयत्न

जम्मू काश्‍मीरमध्ये १९९० मध्ये १९ चित्रपटगृहे होती. एकट्या श्रीनगरमध्ये दहा चित्रपटगृहे होती. मात्र कट्टरतावाद्यांनी ती बंद पाडल्यानंतर त्यांचा इतर व्यावसायिक कारणांसाठी होऊ लागला. १९९९ मध्ये फारूख अब्दुल्ला यांच्या सरकारने चित्रपटगृहे सुरु करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चित्रपटाचा पहिलाच खेळ सुरु असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा हा व्यवसाय बंद पडला. ‘सीआरपीएफ’नेही श्रीनगरमध्ये एक बंद पडलेले चित्रपटगृह सुरु करण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी त्यालाही आग लावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com