
बदलत्या वातावरणामुळे वनस्पतींमध्ये लिंग गुणोत्तर विषमता; आंब्याचे उत्पादन घटले
मुंबई : लिंग गुणोत्तर विषमता फक्त माणसांपुरतीच मर्यादित नाही. ती फुलांच्या जन्मातही दिसून येत असल्याचे मत वनस्पतीशास्त्रज्ञांनी मांडले आहे. माणसातील लिंग गुणोत्तर विषमता आपण स्वत:च निर्माण केलेली असली तरी झाडांमधील विषमता वातावरण बदलामुळे दिसून येत आहे. याचा सर्वात मोठा बळी ठरत आहे आंबा.
गारपीट आणि ढगाळ वातावरणामुळे गेल्या काही आठवड्यांत बंगळुरूजवळील अखेरचे आंब्याचे उत्पादनही नष्ट होत आहे. अवकाळी पाऊस आणि तापमानातील चढ-उतारांमुळे फुलांचा जन्मदर घटत असून याचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर होत आहे. हर्माफ्रोडाइट फुलांपेक्षा नर फुले जास्त येत आहेत.
आंबा हे andromonoecious plant असून त्यावर नर आणि हर्माफ्रोडाइट फुले फुलतात. हर्माफ्रोडाइट फुलांपासून फळे तयार होतात. याउलट सध्या मोठ्या प्रमाणावर फुलणाऱ्या नर फुलांमुळे आंब्यांची निर्मिती होताना दिसत नाही.
डिसेंबर ते फेब्रुवारीमधील १२ ते २० अंश सेल्सिअस तापमानात नर फुले तयार होतात तर, २१ ते ३० अंश सेल्सिअसमध्ये हर्माफ्रोडाइट फुले तयार होतात. एका आठवड्यापेक्षा जास्त काळ अवकाळी पाऊस पडल्याने माती ओलसर बनली. तापमानाच्या पातळीत कमालीची घट झाल्याने नर फुलांची निर्मिती जास्त होत आहे.
बंगळुरूमध्ये १.६ लाख हेक्टर क्षेत्रफळावरील आंब्याच्या झाडांमधून १४ ते १६ लाख टन उत्पादन अपेक्षित होते. त्यात आता ५० टक्के म्हणजेच ७ ते ८ लाख टनांपर्यंत घट झाली आहे. येथे गेल्या २० ते २५ वर्षांतील सर्वाधिक थंड मे महिना अनुभवास आला. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि आर्द्रता यांमुळे आंब्यावर बुरशी येऊन उत्पादनाचा दर्जा घसरला.