काँग्रेसचा भाजपवर उलटा डाव; अशोक गेहलोत यांनी घेतला मोठा निर्णय

टीम ई सकाळ
Friday, 14 August 2020

आज (ता. १४) होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात स्वतःच विश्वास प्रस्ताव दाखल करणार असून विधासभेत बहुमत सिद्ध करण्याचा इरादा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे

जयपूर : राजस्थान (Rajasthan) मधील राजकीय संघर्ष आता शांत होण्याच्या मार्गावर असून सचिन पायलट यांच्या घरवापसीमुळे काँग्रेस पक्ष मजबूत स्थितीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशात काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर पलटवार करण्याचे संकेत दिले असून आज (ता. १४) होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात स्वतःच विश्वास प्रस्ताव दाखल करणार असून विधासभेत बहुमत सिद्ध करण्याचा इरादा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पूर्णपणे नाहीसा झाल्याचे यातून संकेत देण्याचे अशोक गेहलोत यांनी योजिले आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट घेऊन बातचीत केली होती. त्यानंतर त्यांची घरवापसी झाली. राजस्थानमध्ये आज (शुक्रवार)पासून विधानसभेचे अधिवेशन होणार असून गेहलोत सरकारला या अधिवेशनातून काही बिल पास करुन घ्यायची आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्ष समोर येणार आहे. भाजपने अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याविषयी हालचाली सुरु केलेल्या असतानाच काँग्रेसने भाजपवरच डाव टाकला असून स्वतःच विश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपकडून अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा करण्यात आली होती. भाजप नेते प्रतिपक्ष गुलाब चंद कटारिया (Gulab Chand Kataria) यांनीच भाजप अविश्वास ठराव आणणार असल्याचे घोषित केले होते. कटारिया म्हणाले होते की, आम्ही आमच्या मित्र पक्षांसोबत विधानसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहोत. भाजपकडून अविश्वास प्रस्तावाबाबत वृत्त आल्यानतंर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले की, आम्ही स्वतःच विधानसभेत विश्वास प्रस्ताव आणणार आहेत. यावरून राजस्थानमधील राजकीय वर्तुळात काँग्रेसने भाजपवर उलटा डाव टाकला असल्याच्या चर्चा चालू झाल्या आहेत.

दरम्यान, आज (ता. १४) सुरु होणाऱ्या विधानसभा सत्राच्या आधी अशोक गेहलोत सरकारला मोठा दिलासा मिळाला असून बहुजन समाज पक्षाचे काँग्रेसमध्ये सामील झालेले ६ आमदार विधानसभा अधिवेशनात सहभागी होऊ शकणार आहेत. न्यायालयाने राजस्थान प्रकरणात निकाल देताना बसप आमदारांच्या काँग्रेस प्रवेशावर विरोध करण्याच्या याचिकेवर निर्णय घेऊन स्थगिती देण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत म्हटले आहे की, सध्या उच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु असून सर्वोच्च न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm ashok gehlot will bring confidence motion against bjps no confidence motion rajasthan assembly