मुख्यमंत्र्यांचा बर्थडे; मंत्र्यानं देवीला अर्पण केली अडीच किलोची सोन्याची साडी!

टीम ई-सकाळ
Wednesday, 17 February 2021

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचे समर्थक विविध प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचे समर्थक विविध प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. तेलंगणा सरकारचे मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांनी तर मुख्यमंत्री राव यांच्या वाढदिवसानिमित्त यलम्मा तल्ली देवीला अडीच किलोची सोन्याची साडी अर्पण केली आहे. तसेच तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्यांनी राज्यभरात एक कोटी रोपं लावण्याचा संकल्प केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना 67 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. मोदींनी ट्विट करुन म्हटलं, "तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर गारु यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. मी त्यांच्या प्रदीर्घ आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रार्थना करतो."

आणखी वाचा : निर्देशांकाची सलग दुसरी घसरण; येत्या काळात पाहायला मिळणार मोठी घसरण?

तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसै सौंदरराजन यांनी देखील केसीआर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केसीआर यांना शुभेच्छा देताना म्हटलं, "मी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लोकसेवेसाठी दीर्घायुष्याची कामना करतो." केसीआर यांचा मुलगा के. टी. रामाराव आणि मुलगी के. कविता यांनी देखील ट्विट करु वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, "तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्याला सुख आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी कामना करतो." तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, त्रिपुराचे मुख्यमंत्र बिप्लबकुमार देव आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी देखील केसीआर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM KCR birthday Minister offers 2.5 kg gold sari to Goddess