Politics News : भाजपशी काही देणंघेणं नसेल, तर JDU नेत्यानं उपसभापती पद सोडावं; पीकेंचा नितीशकुमारांवर संशय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Politics News

'नितीश कुमार अजूनही भाजपच्या संपर्कात आहेत. ते कधीही पक्षासोबत युती करू शकतात.'

Politics News : भाजपशी काही देणंघेणं नसेल, तर JDU नेत्यानं उपसभापती पद सोडावं; पीकेंचा नितीशकुमारांवर संशय

Bihar Politics News : निवडणूक रणनीतीकार आणि जनता दल युनायटेडचे (JDU) माजी नेते प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्याबाबत धक्कादायक दावा केलाय.

नितीश कुमार अजूनही भारतीय जनता पक्षाच्या (BJP) संपर्कात आहेत आणि परिस्थिती उद्भवल्यास ते पुन्हा पक्षासोबत युती करू शकतात, असं त्यांनी म्हटलंय. नितीश कुमार यांचा भाजप-एनडीएशी काहीही संबंध नाही, तर ते आपल्या खासदाराला राज्यसभेचं उपसभापती पद सोडण्यास का सांगत नाहीत, असा सवाल प्रशांत किशोर यांनी उपस्थित केलाय. नितीश कुमार यांच्याकडं नेहमीच दोन्ही मार्ग असू शकत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

हेही वाचा: Britain : पंतप्रधान पदासाठी ऋषी सुनक यांना 100 हून अधिक खासदारांचा पाठिंबा

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा फेटाळून लावत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितलं की, त्यांच्या मनात येईल ते, ते बडबडत असतात. केवळ प्रसिद्धीसाठी ते अशी विधानं करत आहेत. प्रशांत किशोर कोणत्या पक्षासाठी काम करताहेत, हे सर्वांना माहीत आहे, असं सांगत नितीश कुमारांनी किशोरांना फटकारलं.

हेही वाचा: भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, 8 वर्षात आम्ही 10 वरून 5 वर घेतली झेप : नरेंद्र मोदी

खासदाराच्या माध्यमातून नितीश कुमार भाजपच्या संपर्कात

जनता दल युनायटेडचे (जेडीयू) खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या माध्यमातून नितीश कुमार अजूनही भाजपच्या संपर्कात असल्याचा आरोप प्रशांत किशोर यांनी केलाय. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'नितीश कुमारजी, तुमचा भाजप/एनडीएशी काही संबंध नसेल तर तुमच्या खासदाराला राज्यसभेचं उपसभापती पद सोडण्यास सांगावं. तुमच्याकडं नेहमीच दोन्ही मार्ग असू शकत नाहीत. नितीश कुमार यांनी भाजपशी संबंध तोडल्यानंतर हरिवंश यांना राजीनामा देण्यास सांगायला हवं होतं, असंही ते म्हणाले. ते या पदावर कायम राहण्याचा आग्रह धरत असतील तर त्यांची जेडीयूमधून हकालपट्टी होऊ शकली असती. पण, नितीश कुमार हा पर्याय भविष्यासाठी खुला ठेवत आहेत, असं त्यांनी सांगितलं.