नऊ महिन्यांचे वेतन घ्या आणि राजीनामा द्या; कॉग्निजंटचा कर्मचाऱ्यांना प्रस्ताव

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 मे 2017

बंगळूर : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे कॉग्निजंट या कंपनीने मनुष्यबळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नऊ महिन्याचे वेतन घेत स्वेच्छा निवृत्त होण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

कॉग्निजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने संचालक पातळीपासून ते वरिष्ठ उपाध्यक्षपदी असलेल्या वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय खुला ठेवला आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ स्तरावरील ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन 40 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे असे व्यक्तीदेखील या पर्यायासाठी पात्र ठरतील. याची भरपाई म्हणून स्वेच्छा निवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 9 महिन्यांचे वेतन देण्यात येणार आहे.

'डिजिटल डिव्हिजन'चा वेग वाढविण्यासाठी आणि उच्च दर्जाची कार्यपद्धती अधिक गतिशील करण्यासाठी कंपनीने पावले टाकली आहेत. कंपनीने भारतातील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय देऊ केला असला तरी जागतिक पातळीवर कंपनीकडून नवीन कर्मचाऱ्यांची भरती सुरू राहणार आहे. शिवाय, कंपनीचा जागतिक पातळीवर विस्तार करण्यात येणार आहे, असे कंपनीच्या प्रवक्‍त्याने सांगितले आहे. मागील वर्षी कंपनीने एकूण कर्मचाऱ्यांमध्ये एक टक्का कर्मचाऱ्यांची कपात केली होती. तर त्यापूर्वीच्या वर्षी एक ते दोन टक्के लोकांना कामावरुन कमी करण्यात आले होते. प्रत्येक कंपनीमध्ये कामाचे वार्षिक मूल्यांकन केले जात असते. त्यातील काही मानांकनावरून कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेण्यात येतो.

Web Title: Cognizant to give 9-month salary as voluntary separation to top executives